मावळ, (पुणे) : गेल्या लोकसभेत मी निवडून येणार हे ठामपणे सांगितलं होतं अन् मी खासदार झालो, अशा शब्दात शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी अजित पवारांसमोरच पार्थ पवारांच्या पराभवावर भाष्य केलं आहे. मावळमध्ये महायुतीच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे बोलत होते.
गेल्या २०१९ च्या निवडणुकीत अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार विरुद्ध श्रीरंग बारणे अशी लढत होती. श्रीरंग बारणे यांनी मोठ्या मताधिक्याने पार्थ पवारांचा पराभव केला होता, अजित पवारांसाठी ती निवडणुक मोठ्या प्रतिष्ठेची होती. त्या निवडणुकीत बारणे यांनी पार्थ पवारांचा पराभव केला होता.
आता तेच विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हे महायुतीचे मावळचे उमेदवार आहेत. त्यामुळे अजित पवार बारणेंच्या प्रचाराला हजेरी लावणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, अजित पवारांनी अखेर मावळमध्ये महायुतीच्या मेळाव्याला हजेरी लावलीच. यावेळी बोलताना महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी गेल्या 2019 मधील निवडणुकीचा दाखला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोरच मांडला. गे
तसेच पुढे बोलताना म्हणाले की, अजित पवारांनी मला पहिलं तिकीट दिलं होतं. महापालिकेत त्यांच्यामुळे मी नगरसेवक म्हणून गेलो. कालांतराने मी वेगळ्या युतीत गेलो. आम्ही संपर्कात होतोच, आत्ता ही लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली, तेव्हा पहिला फोन अजितदादांचा आला.
दरम्यान, अजित पवार म्हणाले की, देशातील आजवर झालेल्या पंतप्रधानाच्या काळात घटना दुरुस्ती किती वेळा झाली. मात्र, विरोधक फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळातील घटना दुरुस्तीवर भाष्य करतात. विरोधकांकडून नको ते मुद्दे उचलले जात आहे त्याला काही अर्थ नाही. विरोधी उमेदवार (संजोग वाघेरे) कदाचित असं सांगेल की अजितदादांनी मला उभं राहायला सांगितलं आहे. असं अजिबात नाही, अख्खा महाराष्ट्र जाणतो मी असलं काही करत नाही. आपला उमेदवार श्रीरंग बारणे आहे, धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबा, भूलथापांना बळी पडू नका.
पुढे बोलताना म्हणाले, 140 कोटींमध्ये 70 कोटी महिला आहेत. आता प्रत्येक महिलांच्या खात्यात 1 लाख टाकायची गॅरंटी द्या म्हणतात. आता मला सांगा असं केलं तर भारत जगातील सर्वाधिक कर्जबाजारी देश होईल. विरोधक बोलायचं म्हणून काहीही बोलत आहेत. ही निवडणूक विचारांची नाही तर विकासाची आहे, विकासाची वज्रमुठ बांधून आपल्याला नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचं असल्याचे अजित पवार म्हणाले.