सुरेश घाडगे
परंडा : परंडा तालुक्यातील भोत्रा येथे पैशाच्या वादातून गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. ही घटना आज शनिवारी (दि. २२) भोत्रा शिवारातील सीना नदी पात्राजवळ घडली. या घटनेमुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेत दोन जण जखमी झाले आहेत. योगेश हनुमंत बुरंगे (रा. परंडा) यांच्या कमरेला गोळी लागल्याने जखमी तर कपील आजिनाथ अलबत्ते यांना डोक्यात दगड लागल्याने जखमी झालेअसून त्याच्यावर बार्शी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चैतन्य शेळके याने त्याचे मित्र सुजित पवार, निखिल गोळे, किरण गोफणे व इतर दोघांच्या मदतीने सीना नदी पात्रातून जाणाऱ्या पायवाटेवर योगेश बुरंगे याला अडवून त्याचावर गोळीबार केला. या घटनेत योगेश हा गंभीर जखमी झाला. त्याला प्राथमिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय आधिकारी यांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी बार्शी येथील जगदाळे मामा रुग्णालयात पाठविले. दरम्यान, जखमी युवकाची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विनोद ईज्जपवार आणि पोलीस कर्मचारी यांनी तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात जाऊन जखमी तरुणाची भेट घेतली. तसेच घटनास्थळी भेट देऊन महत्वपूर्ण पूरावे जप्त केले. तसेच जखमी तरुणाचा जबाब घेऊन फरार आरोपीचा शोध घेण्याकरीता पोलीस पथक रवाना करण्यात आले आहेत. याप्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक किरण धोंगडे करीत आहेत.
नेमकं काय घडलं?
चैतन्य शेळके वारंवार फिर्यादीकडे विनाकारण पैशाची मागणी करत असे. यापूर्वीही यावरून त्यांचे भांडण झाले होते. शनिवारी दुपारी फिर्यादी योगेश शेतात जात असताना चैतन्य शेळके आणि त्याच्या मित्रांनी फिर्यादीला सीना नदीपात्रातून जाणाऱ्या पायवाटेवर आडविले व त्याचेकडे पैशाची मागणी केली. योगेशने पैसे देण्यास नकार दिलाने, चैतन्य आणि त्याच्या मित्रांनी फिर्यादी योगेश आणि त्याचा साथीदार कपील अलबत्ते यांना मारहाण केली. अलबत्ते यांच्या डोक्यात दगड मारून जखमी केले. तसेच चैतन्य शेळके याने योगेशवर गोळीबार केला, या घटनेत दोघेही जखमी झाले.