पुणे : पुण्यातील धनकवडी येथील पाटीलनगरमधून एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. दोन टोळ्यांनी राडा घालत ‘‘आपणच इथले भाई आहोत, जो समोर येईल, त्याला सोडायचे नाही’’ असे म्हणत एकावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे. हि घटना पाटीलनगरमध्ये शनिवारी १२ ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी रोहित राजेंद्र रोंगे (वय-२५, रा. गोंविदराव पाटीलनगर, धनकवडी) यांनी सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.
त्यावरुन संकेत कसबे (वय-२३, रा. वनराई कॉलनी), सोहम सोनार (वय-२०), शंशांक मेमाणे, पियुष भरम (वय-२३, रा. आंबेगाव पठार), युवराज धुळे (वय-१८, रा. कात्रज) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या घराचे पार्किंगमध्ये असताना आरोपी हत्यारासह त्याठिकाणी आले. त्यांनी फिर्यादीच्या डोक्यात आणि दोन्ही हातावर कोयत्याने वार करुन त्यांना गंभीर जखमी केले. तसेच त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन अश्लिल शिवीगाळ देखील केली आहे.
फिर्यादी यांच्या आजी पुढे आल्या, तेव्हा त्यांच्या हातावर उलट्या कोयत्याने मारुन त्यांना जखमी केले. त्यांच्या हातातील कोयते हवेत फिरवून ‘‘आपण इथले भाई आहोत़ जो समोर येईल त्याला सोडायचे नाही,’’ असे मोठ मोठ्याने ओरडून तेथील परिसरात दहशत निर्माण केली.
दरम्यान, रोहित रोंगे याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रोहितवरील हल्ल्याची माहिती त्याच्या मित्रांना समजताच त्यांनी टोळी रहात असलेल्या गणेश चौकातील शेलार चाळ येथे गेले. त्यांनी रोहितवर हल्ला करणार्यां आरोपींचा शोध घेतला. मात्र, ते न सापडल्याने तेथे असलेल्या रिक्षाच्या काचा फोडल्या. तसेच राजेश कुंजीर यांची चार चाकी गाडीच्या मागील बाजूस कोयते मारुन मोठया प्रमाणात नुकसान केले. तसेच दोन दुचाकींवर वार करुन त्यांचे नुकसान केले. पुढील तपास सहकारनगर पोलीस करीत आहेत.