पुणे : कोरेगाव पार्क परिसरात भर दिवसा एका तृतीयपंथी महिलेने रस्त्यात धिंगाणा घालून पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करुन धक्काबुक्की केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. रविवारी (ता. १४) दुपारी दोनच्या सुमारास लेन नं. ६ येथील दुर्गा कॅफेसमोर ही घटना घडली. या प्रकरणी एका तृतीयपंथी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पोलीस शिपाई दशरथ तुळशिराम सावंत यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून चारचाकी गाडीतील (एमएच ०१ बीयु ७१४०) तृतीयपंथी महिला चालक काव्या (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरेगाव पार्क येथील दुर्गा कॅफेसमोर आरोपीने तिची चारचाकी रस्त्याच्या मधोमध उभी केली होती. त्यावेळी फिर्यादी दशरथ सावंत हे कोरेगाव पार्क परिसरातील लेन नं. ६ येथे पेट्रोलिंग करत होते. सावंत यांनी तिला कार बाजूला घेण्यास सांगितले. याच गोष्टीचा राग अनावर झाल्याने आरोपीने पोलिसांना अश्लील शिवीगाळ करुन आरडाओरडा केली आणि सावंत यांच्या अंगावर धावून गेली.
एवढ्यावर न थांबता फिर्यादी यांची कॉलर पकडून धक्काबुक्की केली. या वेळी सावंत हे त्यांच्या मोबाईलमध्ये या प्रकाराचे शूटींग करत होते. त्याचवेळी संतप्त आरोपीने त्यांच्या हातातून मोबाईल हिसकावून घेवून फेकून दिला. याप्रकरणी आरोपीवर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नरळे करीत आहेत.