पुणे : जुन्या भांडणाच्या कारणावरुन ‘तुम्हाला जास्त मस्ती आली का,’ असे म्हणत टोळक्याने तरुणाला लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच कोयत्याने सपासप वार करुन जबर जखमी केल्याची घटना अप्पर बिबवेवाडी येथील संविधान चौकात मंगळवारी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास घडली. या वेळी मदतीसाठी येत असलेल्या लोकांना कोयत्याचा धाक दाखवून दहशत पसरविण्याचा प्रयत्नही झाला. या प्रकरणी चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत दीपक महादेव रणदिवे (वय १८, रा. राजीव गांधीनगर, अप्पर बिबवेवाडी) याने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी ओंकार भिसे, राजू प्रल्हाद गुळबिळे, प्रणव अमित गडदे, रोहन अभंग (सर्व रा. अप्पर इंदिरानगर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे दोघे एकमेकांच्या परिचयाचे आहेत. फिर्यादी व त्यांचा मित्र प्रथमेश जानराव हे दोघे ओंकार अनिल शिंदे याला घरी सोडून येत असताना आरोपी मोटारसायकलवरुन संविधान चौकात आले. त्यांनी फिर्यादी व त्याच्या मित्राला थांबविले. जुन्या भांडणाच्या कारणावरुन तुम्हाला जास्त मस्ती आली का असे म्हणून फिर्यादी यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. हातातील लोखंडी हत्यारे उलटे करुन फिर्यादीच्या उजव्या हातावर, पायाचे मांडीवर, नडगीवर, पोटावर पाठीवर, डोक्यावर मारुन जबर जखमी केले.
नराधम टोळक्याने फिर्यादीच्या मित्रालाही मारहाण केली. ही घटना कोणाला सांगितली तर तुम्हाला जीवे मारु, अशी धमकी दिली. त्यावेळी त्याठिकाणी असणारे घरातील काही लोक आवाज ऐकून मदतीसाठी येत असताना आरोपींनी हातातील हत्यारे हवेत फिरवून कोणी मध्ये आला तर एकेकाला खल्लास करुन टाकीन, अशी धमकी देऊन दहशत पसरवली.