-सागर जगदाळे
भिगवण : येथील सत्ताधाऱ्यांना भिगवणकरांनी बहुमताने सत्ता दिली खरी, परंतु त्या सत्तेचा वापर जनतेच्या हितासाठी होण्याऐवजी स्वार्थासाठी आणि वर्चस्वासाठी होताना दिसत आहे. (दि.29 नोव्हेंबर) रोजी घेण्यात आलेल्या ग्रामसभेला चक्क ग्रामपंचायत सदस्यच अनुपस्थित राहिल्याने नागरिकांच्या समस्यांकडे ग्रा.प.समस्यांनी सोयीस्करपणे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. ग्रामसभेपुर्वी घेण्यात आलेल्या मासिक मिटिंगला तर फक्त सरपंच आणि ग्रामसेवकच उपस्थित होते. इतर सदस्यांनी मात्र दांडी मारली.
गावातील अडीअडचणी व ग्रामस्थांच्या समस्या सोडवण्यासाठी ग्रामसभा व मासिक मिटिंग घेण्यात येते. यामध्ये खरेदी खत नोंद करणे, जन्म मृत्यू नोंद करणे, गावातील विकास कामांवर चर्चा करणे, वित्त आयोग आराखडा तयार करणे, जमा खर्च मंजूर करणे, कर्ज/बोजा नोंद करणे, कमी करणे, वारस नोंद करणे, शासन निर्णयाची अंमलबजावणी करणे, अशा वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात येतात. परंतु गणसंख्ये अभावी मासिक मिटिंग व ग्रामसभा तहकूब झाल्याने नागरिकांचे अनेक प्रश्न, कामे प्रलंबित राहिल्याने ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. अशा सभांना ग्रामपंचायत सदस्य यांनी दांडी मारणे म्हणजे जनतेच्या मताचा अनादर करण्यासारखेच असल्याचे बोलले जात आहे.
ज्या नागरिकांनी विश्वास ठेवून बहुमताने सत्ता ताब्यात दिली. त्या सदस्यांनी लोकांच्या अडचणीवर जबाबदारी घेऊन काम करणे गरजेचे आहे. परंतु मासिक मीटिंग, ग्रामसभा अशा निर्णायक प्रक्रियेतून माघार घेत सदस्य अनुपस्थित राहणार असतील तर सदस्यांनी राजीनामा देऊन ग्रामपंचायत मधून बाहेर पडावे. कारण विकास व भ्रष्टाचारमुक्त कारभार या मुद्द्यावर नव्याने अनेक तरुण ग्रामपंचायतमध्ये काम करण्यासाठी इच्छुक आहेत.
-आप्पासाहेब गायकवाड, ग्रामस्थ-भिगवण