सुरेश घाडगे
परंडा : तालुक्यातील बंगाळवाडी जिल्हा परिषद शाळेत एक शिक्षक चक्क दारू पिऊन वर्गातच झोपल्याने विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांची झोप उडाली. यामुळे संतप्त पालकांसह शालेय समिती सदस्यांनी परंडा गटशिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन देवून शिक्षकास कायमस्वरूपी निलंबीत करण्याची मागणी केली.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बंगाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक ८ जानेवारी रोजी शाळा चालू झाल्यानंतर तब्बल तीन तास उशिराने शाळेत आले. यानंतर ते दारु पिवून विद्यार्थ्यांच्या मधोमधच दोन पोती टाकून झोपल्याचे निदर्शनास आले.
फुल्ल ‘माल’ लावून तऱ्हाट! भर शाळेत मास्तर झिंग झिंग… झिंगाट, कोण उतरविणार नशा? पाहा व्हिडिओ
View this post on Instagram
याबाबत विचारले असता त्यांनी अरेरावी करीत, शिवीगाळ केली. मला विचारणारे तुम्ही कोण? मला कामाची गरज नाय, काय करायचं ते करा? असे म्हणत त्यांनी उद्धटपणे वर्तन केले. या शिक्षकाला कायमस्वरुपी निलंबीत करावे, अन्यथा शाळेला कुलूप ठोकून परंडा गटशिक्षणाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा पालक व शालेय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. या शिक्षकाचे फोटो, व्हिडिओ ग्रामस्थांनी व्हायरल केले असून, कठोर कारवाईची मागणी केली आहे.
या वेळी शालेय समितीचे अध्यक्ष पवन सुरवसे, उपाध्यक्ष स्वानंद सूर्यवंशी, दशरथ सूर्यवंशी, दादासाहेब जगताप, बबन सूर्यवंशी आदी उपस्थित होते. विशेषतः शाळेत पहिली ते पाचवीपर्यंत वर्ग असून, दोनच शिक्षक आहेत. यापैकी एक शिक्षक तर दारुच्या नशेत झिंगताना आढळून आल्याने विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.