पुणे : पुणे मेट्रो सुरू झाल्यानंतर पुणेकरांनी मेट्रोला भरभरून प्रतिसाद दिला. मेट्रोने अन्य प्रवाशांसोबतच सायकलस्वार, अपंग, विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबवून मेट्रो प्रवासाला चालना दिली. आता प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पुणे मेट्रो कार्ड आणि पुणे मेट्रो स्टुडंट पासवरील हेल्पलाईन क्रमांक बदलण्यात आला आहे. ‘वन पुणे कार्ड आणि वन पुणे विद्यार्थी पास हेल्पलाईन क्रमांक बदलला आहे. कार्डधारक प्रवासी २३ फेब्रुवारीपासून ०२२-४५०००८०० या नवीन क्रमांकावर संपर्क साधून मदत घेऊ शकतात, असे त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे.
पुणे मेट्रोच्या एक्स हँडलवरून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे की, “अटेंशन पॅसेंजर : रिटर्न जर्नी तिकीट (आरजेटी) खरेदी करण्याची सुविधा १ मार्च २०२४ पासून बंद केली जाईल. आम्ही सर्व प्रवाशांना विनंती करतो की, त्यांनी या महत्वाच्या अपडेटची नोंद घ्यावी. या बदलामुळे आता प्रवाशांना १ मार्चपासून परतीच्या प्रवासाची तिकिटे खरेदी करता येणार नसल्याची माहिती मिळत आहे.
पुणे मेट्रोने रुबी हॉल ते रामवाडी मार्गाचे काम पूर्ण केले आहे. सध्या प्रवासी सेवा लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. केंद्रीय मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) आयुक्तांनी प्रवासी सेवा सुरू करण्यास सशर्त मान्यता दिली आहे; परंतु राज्य सरकारने अद्याप परवानगी दिलेली नाही. साधू वासवानी रेल्वे ओव्हरब्रिज पाडण्यासाठी वाहतूक वळविण्यात आल्याने सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे या मार्गावर मेट्रो सेवा सुरू करावी, अशी मागणी केली जात आहे.
पुण्यात पुणे मेट्रोकडून वनाझ ते रामवाडी आणि पिंपरी चिंचवड ते स्वारगेट असे ३३ किलोमीटरचे दोन मेट्रो मार्ग उभारण्यात येत आहेत. त्यातील २५ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे आणि आठ किलोमीटरचे बाती आहे. मात्र, या २५ किलोमीटरवर प्रवाशांची संख्या वाढण्याऐवजी घटली आहे. सुरुवातीला मेट्रो कशी आहे हे पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली. पुणे मेट्रोत ढोल ताशा , फॅशन शो, जादूचे प्रयोग, झिम्मा-फुगडी असे अनेक खेळ खेळले गेले. मात्र, सुरुवातीची उत्सुकता संपल्यावर ही प्रवासी संख्या कमी होत गेली.