उरुळी कांचन, (पुणे) : रस्ते सुरक्षित करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान किंवा पायाभूत सुविधांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. नागरिकांनी सीट बेल्ट, हेल्मेट आणि इतर सुरक्षा उपायांच्या वापरास प्रोत्साहन दिल्यास अपघातास आळा बसू शकतो, असे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे (आरटीओ) सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक दिनेश पाटील यांनी सांगितले.
नायगाव (ता. हवेली) येथील अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड पुणे बल्क टर्मिनल पेठ, नायगाव (ता. हवेली) या ठिकाणी शुक्रवारी (ता. १६) ३५ वा सडक सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दिनेश पाटील बोलत होते. यावेळी सहायक मोटार वाहन निरीक्षक श्रद्धा कुंदापुरे, कंपनी विभागाच्या प्रमुख निशा जैन, कंपनीचे लॉजीस्टिक हेड मधुकर सांगा, इम्रान खान, प्रकाश मेवाडे, नंदराम झगडे, ज्ञानेश्वर पाटील, अमित गायकवाड, अरुणराज रेड्डी, शांताराम पवार, सीमा कुमारी, स्नेहा सुरवसे, आशा किरण, उषा सिन्हा, संतोष उज्वला, सचिन पवार आदी उपस्थित होते.
अपघातानंतर बघ्याची भूमिका घेऊ नका
सहायक मोटार वाहन निरीक्षक श्रद्धा कुंदापुरे म्हणाल्या, “अपघात झाल्यानंतर जखमींना मदत करण्यासाठी सतर्क करण्याची गरज असून, अपघातानंतर बघ्याची भूमिका घेऊ नका. वाहन चालवताना मोबाईचा वापर टाळा. शारीरिक व मानसिक स्थिती बरोबर असेल तरच वाहन चालविले पाहिजे.”
विविध घोषवाक्य सादर
रस्ता सुरक्षेच्यादृष्टीने आवश्यक असलेली घोषवाक्य सादर करण्यात आली. ‘होईल दोन मिनिटांचा उशीर, पण जीवन राहील सुरक्षित’, ‘नका देऊ प्राण, नका घेऊ प्राण, डावीकडून चालून राखा आयुष्याची शान’, ‘पाळूया निर्बंध रहदारीचा, करुया प्रवास आनंदाचा’, ‘उल्लंघन कराल रहदारी नियमांचे, अपंग व्हाल आयुष्यात कायमचे’, असे विविध जनजागृतीपर घोषवाक्य सादर करत रस्ता सुरक्षा अभियानाच्या निमित्ताने सुरक्षित वाहतुकीचा जागर केला.
दरम्यान, कंपनीतील कर्मचाऱ्यांकडून वाहनचालकांना तसेच उपस्थित असलेल्या नागरिकांना सडक सुरक्षा अभियानाचे पथनाट्य (ए भाई, जरा देख के चलो) दाखवण्यात आले. तसेच महेंद्र सिंग यांनी चालकांना लायसन्स व इतर प्रमुख कागदपत्रांचे महत्व सांगून वाहनधारकांना रस्ता सुरक्षेचे महत्त्व पटवून दिले. आभार अमित गायकवाड यांनी मानले.