पुणे : राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी नवीन पॅटर्न २०२५ पासून लागू करा, या मागणीसाठी पुण्यात एमपीएससीचे विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. पुण्यातील नवी पेठेतील अहिल्या शिक्षण संस्थेसमोर शेकडो विद्यार्थी विविध मागण्यांसाठी रत्यावर उतरले आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यावेळी विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली.
पुण्यात मोठ्या प्रमाणात एमपीएससीचा अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत. अनेक वर्ष विद्यार्थी राज्यसेवा परीक्षेचा अभ्यास करतात मात्र २०२३ मध्ये अभ्यासक्रमात बदल करण्यात येणार असल्याने विद्यार्थी आक्रमक झाले आहे. अभ्यासक्रमातील बदल विद्यार्थांना मान्य नाही. त्यामुळे नवा अभ्यासक्रमाबाबतच नियम किंवा नवा पॅटर्न २०२५ मध्ये लागू करावा, अशी मागणी विद्यार्थांनी राज्य सरकारकडे केली आहे.
मागील काही वर्षांपासून विद्यार्थी राज्यसेवा परीक्षेचा अभ्यास करत आहेत. शिवाय मागील दोन वर्ष कोरोनाच्या काळात देखील विद्यार्थांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. त्यानंतर परीक्षादेखील लांबणीवर गेल्या होत्या या सगळ्यांमुळे विद्यार्थी संतप्त होतेच त्यात आता नवा पॅटर्न लागू करणार असल्याने विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.
या नव्या पॅटर्नबाबत जर सरकारने निर्णय घेतला नाही तर पुन्हा मोठं आंदोलन करु, असा इशारा विद्यार्थांनी सरकारला दिला आहे. नवीन पॅटर्न २०२५ मध्ये लागू केला तर, जुन्या पद्धतीने अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना शेवटच्या दोन संधी मिळतील. पॅटर्न लागू करण्याची घाई झाली तर विद्यार्थ्यांचे नुकसान होईल. याबाबत सरकारने विचार करावा, अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे.
विद्यार्थांच्या आंदोलनाच्या वेळी अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आंदोलन थांबवण्यासाठी पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र विद्यार्थी आंदोलनावर ठाम आहेत. विद्यार्थ्यांना आंदोलनात कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.