दीपक खिलारे
इंदापूर : देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वाखालील केंद्र सरकार व राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्वावरील राज्य सरकार हे सर्वसामान्य नागरिकांसाठी शेकडो योजना राबवित आहे.
केंद्र व राज्य सरकारच्या योजना समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्याचे काम नूतन सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी प्रभावीपणे करावे, असे आवाहन भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथे बुधवारी (दि.२१) केले. इंदापूर तालुक्यातील जनतेने ग्रामपंचायत निकालांमधून भाजपला स्पष्टपणे कौल दिला आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
इंदापूर तालुक्यात २६ ग्रामपंचायतींपैकी १९ ग्रामपंचायतीवर भाजपने वर्चस्व प्राप्त केले आहे. या १९ ग्रामपंचायतींचे सरपंच व ग्रा. पं. सदस्यांसह उर्वरित ग्रामपंचायतीं मधीलही भाजपच्या निवडून आलेल्या ग्रा. पं.सदस्यांचा सत्कार हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते येथील गुरुकृपा सांस्कृतिक भवनमध्ये करण्यात आला. याप्रसंगी हर्षवर्धन पाटील मार्गदर्शन करत होते.
ते पुढे म्हणाले, इंदापूरच्या लोकप्रतिनिधीच्या विरोधात जनतेने दिलेला स्पष्ट कौल आहे. या निवडणुकीच्या निकालातून भाजपचे इंदापूर तालुक्यावरील निर्विवाद वर्चस्व पुन्हा सिद्ध झाले आहे.
केंद्रात व राज्यात आपली सत्ता असल्याने आगामी काळात विकास कामांसाठी ग्रामपंचायतींना निधी कमी पडू देणार जाणार नाही. नूतन सरपंच व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सामान्य माणसाच्या विकासासाठी प्रयत्नशील रहावे.
राज्यात शिवसेना-भाजप सरकार आल्यानंतर तालुक्यात अनेक गावांमध्ये ‘हर घर हर जल’ योजनांना पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मंजुरी दिली आहे. इंदापूर तालुक्यातील जनतेने नेहमी निवडणुकीत जनशक्तीच्या बाजूने पाठिंबा दिला आहे.
भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने अहोरात्र विजयासाठी परिश्रम घेतल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. तसेच भाजपला भरभरून मतदान केल्याबद्दल हर्षवर्धन पाटील यांनी मतदारांचे आभार व्यक्त केले. आगामी काळात येणाऱ्या सर्वच निवडणुका ताकदीने लढवून भाजप जिंकेल, असेही हर्षवर्धन पाटील यांनी भाषणात स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंदापूर तालुका भाजपचे अध्यक्ष अॅड.शरद जामदार यांनी केले. यावेळी पृथ्वीराज जाचक, अॅड कृष्णाजी यादव, विलास वाघमोडे, मारुती वणवे, डॉ. लक्ष्मण आसबे, नूतन सरपंच मयूरी जामदार आदींनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रघुनाथ पन्हाळकर यांनी तर आभार इंदापूर शहराध्यक्ष शकील सय्यद यांनी मानले.