पुणे: शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीचे धार्मिक तसेच तीर्थक्षेत्र पर्यटन क्षेत्र आहे. या बरोबरच रांजनगावच्या ग्रामपंचायत हद्दीत ‘एमआयडीसी’ आहे. यामुळे या भागात स्थलांतरीत लोकसंख्येचे प्रमाण अधिक आहे. भविष्यातील या क्षेत्रातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करुन जलजीवन मिशन अंतर्गत घोड धरणावरून नवीन पाणीपुरवठा योजना तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (२५ फेब्रूवारी) संबंधित अधिकारी आणि विभागाला दिल्या आहेत.
आज (२५ फेब्रूवारी) रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीच्या विविध प्रश्नांसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार मार्गदर्शन करताना म्हणाले की, अष्टविनायकांपैकी एक असलेले पुण्यातील रांजणगाव गणपती हे ठिकाण राज्यातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आणि पर्यटनस्थळ म्हणून पुढे आले आहे. रांजनगाव परिसरात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा प्रयत्नातुन अनेक उद्योग-व्यवसाय स्थापन झाले आहेत. यामुळे रोजगारासाठी रांजणगाव गणपती ग्रामपंचायत हद्दीत स्थलांतरीत लोकसंख्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे रांजनगाव ग्रामपंचायतीच्या पायाभूत सुविधांवर ताण येत आहे. म्हणून भविष्यातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करुन जलजीवन मिशनअंतर्गत घोड धरणावरून नवीन पाणी पुरवठा योजना तातडीने अंमलात आणत पूर्ण करावी लागणार आहे.
पुढे बोलताना म्हणाले, वाढत्या लोकसंखेच विचार करता रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीला आवश्यक नागरी सुविधा देण्यासाठी पुरेशा क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणे गरजेचे आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक निधी जिल्हा नियोजन समिती, स्वच्छ भारत मिशनमधून देण्यात येईल, त्याचबरोबर रांजनगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील उद्योजकांकडून सामाजिक दायित्व म्हणून निधी उभारून त्यांचाही समावेश यात करून घ्यावा. यावेळी उपमुख्य मंत्र्यांनी रांजणगाव, ढोकसावंगी, कारेगाव, या ग्रामपंचायतीकडून सूचविण्यात आलेली विकासकामे ‘एमआयडीसी’ मार्फत करण्याच्या सूचना त्यांनी ‘एमआयडीसी’च्या अधिकाऱ्यांना आणि संबंधित विभागाला दिल्या आहेत.
या बैठकीला काही अधिकारी दुरदृश्य प्रणालीद्वारे हजर होते. ही बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात बैठक आयोजित करण्यात आली होती. यात राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार उपस्थित होते.
तसेच पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे,महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक कुणाल खेमनार, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे जनरल मॅनेजर (भूसंपादन) बप्पासाहेब थोरात, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता वैशाली आवटे, यांच्यासह संबंधित विभाग व त्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.