पुणे, ता. 25: पुणेकरांची वाहतुकीची शिस्त सर्वत्र प्रसिद्ध असून अनेकदा सिग्नल पाळावा म्हणून पोलिसांना चौका चौकात दोरी धरून उभे राहावे लागते. तरीही अनेकजण वाहतुकीच्या नियमांचा सर्रास बोजवारा उडवतात. मात्र सोमवारी पुणे पोलिसांनी केवळ दोन तासांत तब्बल ४ हजार १७८ बेशिस्त वाहनचालकांवर दंडाची कारवाई करून रस्ते शिस्तीचा नवा परिपाठ घालून दिला.
काल सोमवार दिनांक २४ फेब्रुवारी रोजी दुपारी चार ते सायंकाळी ६ या वेळेस एकाच वेळी पुणे शहरातील ७८ मुख्य रस्ते आणि चौकांमध्ये पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईचे वैशिष्ट्य म्हणजे पुण्याचे सह पोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी रस्त्यावर उतरले होते.
या कारवाई दरम्यान अनेक बेशिस्त दुचाकी, चारचाकी वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून दोन तासांत तब्बल १३ लाख ६५ हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात आला. तसेच पोलिसांनी विविध प्रकारच्या वाहतुकीचा नियमभंग करणाऱ्या तब्बल ३७१ वाहनांना जप्तही केले आहे.
सध्या पुण्यातील अनेक वर्दळीच्या रस्त्यांवर वाहतुक कोंडी होण्याबरोबरच अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. काही बेशिस्त वाहनचालकांमुळे हे प्रकार घडत असतात. अशा वाहनचालकांना शिस्त लावावी तसेच त्याच्यात वाहतुकीच्या नियमांबद्दल आणि रस्ते सुरक्षाबद्दल जागृती यावी या उद्देशाने ही मोहीम सुरु केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दरम्यान वारंवार नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांना पोलिसांनी चांगलीच चपराक दिली असून त्यांची वाहने जप्त केली जाणार आहेत.
भविष्यातही ही कारवाई सुरू राहणार असून पुणे करांनी स्वत:च्या सुरक्षेसाठी आणि शिस्तीसाठी तरी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.