पुणे : गुंतवणूक आणि खर्चात प्रचंड वाढ झाल्याने पेट्रोल डीलर्सचा व्यवसाय अव्यवहार्य झाला आहे. राज्यातील अनेक पंप बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. मागील ७ वर्षांपासून डीलर्सना कमिशन मिळालेले नाही. त्यामुळे पेट्रोल डीलर्सच्या मार्जिनमध्ये तत्काळ आणि वाजवी वाढ त्वरित मिळावी, अशी मागणी डीलर्सच्या शिष्टमंडळाने केली आहे.
भारतातील २२ राज्य आणि १ केंद्रशासित प्रदेशाने डीलर्स कमिशनमध्ये वाढ करण्यासाठी निवेदन देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुषंगाने पुणे जिल्ह्यातील कार्यकारी समिती सदस्य आणि डीलर्सच्या शिष्टमंडळाने फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डीलर्स असोसिएशन टीम आणि मुंबई पेट्रोल डीलर्स असोसिएशन यांच्यासह मुंबईतील राज्यस्तरीय समन्वयक कार्यालयाला भेट दिली. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
दरम्यान, मागील ७ वर्षांपासून डीलर्सच्या मार्जिन कमिशनच्या संदर्भातील मागणीकडे लक्ष दिले जात नसल्याने या समस्येकडे प्राधान्याने लक्ष देण्याची गरज आहे. या वेळी डीलर ट्रेड मार्जिनसाठी कायमस्वरूपी यंत्रणा विकसित आणि लागू करण्यावर भर दिला. तसेच या संदर्भात पुणे ‘पीडीए’ने या समस्येचे निराकरण करण्यासाठी तातडीने कंपनी स्तरावरील बैठक बोलविणार आहे.
याबाबत बोलताना पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष ध्रुव रुपारेल म्हणाले की, आम्ही पेट्रोलियम मंत्र्यांना विनंती करतो की कृपया या प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी. कारण विक्री कमी होत असताना खर्च वाढत आहेत आणि आमच्या डीलर्ससाठी व्यवसाय करणे खूप कठीण होत आहे.