पुणे : पुणे शहरासह जिल्ह्यात अतिवृष्टी नव्हे, तर हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला होता. फक्त घाटमाथ्याच्या काही भागाला सावधानतेचा इशारा दिला होता. तो देखील सोमवारी रात्रीपर्यंतच होता. त्यामुळे शाळांना सुटी देण्याचा सल्ला जिल्हा प्रशासनाला हवामान विभागाने दिला नाही, असे स्पष्टीकरण पुणे वेधशाळेच्या प्रमुख डॉ. मेधा खोले यांनी दिले.
जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी शहरासह जिल्ह्यातील सर्व शाळा व १२ वीपर्यंतच्या महाविद्यालयांना मंगळवारी अतिवृष्टी होणार असल्याचे जाहीर करीत शाळांना सुटी देण्याचे आदेश काढले. मात्र, जिल्ह्यासह शहरात मंगळवारी ९ जुलै रोजी कुठेही पावसाचा जोर बघायला मिळाला नाही. शहरात तर दिवसभर ऊन पडले होते. त्यामुळे समाज माध्यमांवर हवामान विभाग प्रचंड ट्रोल झाल्याचे दिसून आले.
त्या पार्श्वभूमीवर पुणे हवामान विभागप्रमुख डॉ. मेधा खोले यांना विचारणा केली असता त्या म्हणाल्या कि, मी सोमवारी सुटीवर होते. तरी मला किंवा माझ्या विभागातील एकाही अधिकाऱ्याला जिल्हा प्रशासनातून याबाबत फोनवर विचारणा झालेली नाही. प्रत्यक्षात आम्ही पुणे जिल्हा आणि शहरात रेड अलर्ट दिलेला नव्हता. हे अलर्ट समजून घेण्यात चूक झाली असावी, असे वाटते.
घाटमाथ्यावरच तीन तासांचा अलर्ट..
डॉ. खोले यांनी सांगितले की, आम्ही सोमवारी जो अलर्ट दिला होता, तो घाट माध्यासाठी होता. तो देखील सोमवारी रात्री तीन तासांसाठी होता. मात्र, मंगळवारी कुठेही रेड किंवा ऑरेंज अलर्ट अथवा अतिवृष्टीचा अलर्ट दिलेला नव्हता. शहर आणि जिल्ह्यात हलका ते मध्यम पावसाचाच अंदाज दिला होता.