पुणे : बेकायदेशिररित्या गावठी कट्टा व जिवंत काडतुस बाळगल्या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी एकाला अटक केली असून, त्याच्याकडून ४० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नवीन हायवेवरील दरी पुलाजवळ सोमवारी (ता. २०) पोलिसांनी ही कारवाई केली.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, विजयकुमार तुळशीराम शिंदे (वय ३१, रा. भुगाव, माळवाडी फाटा, ता. मुळशी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात आर्म अॅक्ट व महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवीन हायवेवरील दरी पुलाजवळ एक व्यक्ती गावठी कट्टा घेऊन थांबल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे पोलीस अंमलदार चेतन गोरे, महेश बारवकर व निलेश जमदाडे यांना मिळाली. माहितीची खात्री करुन तपास पथकाने जांभुळवाडी दरी पूल परिसरात आरोपीचा शोध घेतला.
पथकाने विजयकुमार शिंदे याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडे ४० हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा व २०० रुपयांचे एक काडतूस आढळून आले. पोलिसांनी गावठी कट्टा व काडतुस जप्त केले आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ- २ स्मार्तना पाटील यांच्यासह अन्य पोलिसांनी केली.