भोर : तालुक्यातील पसुरे, करंदी परिसर व वेल्ह्यातील राजगड किल्ल्याच्या पायथ्याला मर्गासानी परिसरातून लाल मातीची तस्करी केली जात असल्याचा प्रकार उघड होऊ लागला आहे. माती तस्कर व प्रशासकीय विभागातील काही कर्मचाऱ्यांच्या “अर्थपूर्ण” संबंधांमुळे हा व्यवसाय जोमात सुरू आहे. यामध्ये तालुका प्रशासनातील काही कर्मचाऱ्यांनी हात ओले केले असल्याने मातीची तस्करी ‘रॉयलटी’ च्या नावाखाली राजरोसपणे सुरू आहे.
माती माफियाकडून मलिद्याचे वाटप
माती तस्करी करीत असताना एका नाममात्र आकड्यावर शेतकऱ्यांची बोळवण केली जाते. प्रोटोकॉलच्या जिवावर महसूल विभाग, पोलीस विभाग, परिवहन विभाग व उर्वरित खर्च, हप्ता यांचा ताळमेळ घालून हा अवैध प्रकार बिनधास्तपणे सुरू असल्याने तस्कर मालामाल झाले आहेत. आर्थिक संबंधातून प्रशासनाने मूक संमती दिली असल्याने “ऑफ द रेकॉर्ड” तस्कर लाखोंची आकडेमोड करत आहेत. अल्पावधीत व कमी श्रमात बक्कळ माया मिळत असल्याने तरुण वर्गाची पावले माती व्यवसायाकडे पडू लागली आहेत.
अशी केली जाते तस्करी…
पाचशे ब्रासचा नाममात्र परवाना व एक महिन्याचा कालावधी या शासकीय रॉयलटी खाली ‘अवैध’ मातीचे उत्खनन केले जाते. एक महिन्याचा नाममात्र परवान्याच्या जोरावर दिवसाला एका वाहनाच्या दोन फेऱ्या केल्या जातात. म्हणजेच नव्वद ते एकशे वीस ब्रास मातीची तस्करी केली जाते. तर बावीस ते पंचवीस दिवसाच्या कालमर्यादेत तब्बल पाच हजार ब्रास मातीची तस्करी केली जाते. पाचशे ब्रासच्या उत्खननात सुमारे पंधरा ते सोळा गाड्यांचा समावेश असतो. या उत्खननाचा आलेख काढला तर पाच हजार पेक्षा जास्त उत्खनन होत असल्याचे उघड झाले आहे. भोर तालुक्यातून सुमारे तीस गाड्यांच्या माध्यमातून मातीची तस्करी केली जाते.
माती तस्करीतील आकड्यांचा आलेख चढता राहत असून यामधून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. याकामी प्रशासकीय अधिकाऱ्यांची छुपी साथ लाभत असल्याने जिल्हा खनिकर्म अधिकारी कार्यालयाने स्वतंत्र पथक नेमून अवैध माती तस्करीवर अंकुश लावून नैसर्गिक साधन संपत्तीचा अपव्यय टाळावा. तसेच या तस्करीत सहभागी असणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आता स्थानिक नागरिकांमधून होऊ लागली आहे.
निसर्गाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास ..
मुळातच भोर, वेल्हा हा तालुका पहाता अती पर्जन्यमान व निसर्गानी नटलेला आहे. या तालुक्यात टेकडी फोड करून शेतजमीन सपाटीकरणाच्या नावाखाली येथील माती नर्सरी व पॉली हाऊस यांना पुरवली जाते, हे सर्व उघड्या डोळ्याने दिसत असून देखील कारवाई होत नाही. यामुळे स्थानिक गुन्हेगारी वाढली असून प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सोप्या पद्धतीने गुन्हेगारीला खत पाणी घालण्याचे काम सुरू असून यासाठी कठोर पावले उचलणे गरजेचे आहे.
याबाबत बोलताना भोर-वेल्ह्याचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे म्हणाले की, भोर व वेल्हा तालुक्यात बेकायदा मातीचे उत्खनन अथवा रॉयलटीपेक्षा जास्त मातीची विक्री केली असेल तर लवकरच पथक लावून कारवाई करण्याचे आदेश देण्यात येतील. तसेच याबाबत दोन्ही तहसीलदारांना सूचना करण्यात येतील.