अक्षय टेमगिरे
रांजणगाव गणपती: अवैधपणे वाळूचे उत्खनन व वाहतुकीवर बंदी असतानाही महसूल विभागाच्या नाकावर टिचून भिमा नदी पात्रातून बेकायदा वाळू उपसा सुरू आहे. त्यामुळे शासकीय गौणखनिज चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार शिवतक्रार म्हाळुंगी (ता. शिरूर) येथे बुधवारी (ता. २८) सकाळी उघडकीस आला आहे. वाळूमाफिया टोळ्यांकडून नद्यांची लचकेतोड सुरू असून महसूलच्या मेहेरबानीने खुलेआम वाळू चोरी सुरू आहे, अशी चर्चा दबक्या आवाजात नागरिकांमध्ये सुरु आहे. याबाबत महसूल विभागाच्या मंडल अधिकारी कार्यालयाला थांगपत्ता लागत नसल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर संशय निर्माण होत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून शिवतक्रार म्हाळुंगी (ता. शिरूर) येथे भीमा नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा सुरू आहे. वाळूमाफियांनी मंगळवारी (ता.२७) रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन भिमा नदी पात्रातून जेसीबी व ट्रॅक्टरच्या सहाय्याने बेकायदा वाळूचे उत्खनन केले. या उत्खननातून सुमारे शेकडो ब्रास वाळूची चोरी केली.
शासनाकडून कुठलीही परवानगी दिलेली नसताना बेकायदेशीर वाळूची चोरी करून शासनाच्या नियमांना पायदळी तुडवण्याचे काम सर्रासपणे सुरू आहे. मात्र, महसूल विभाग व स्थानिक प्रशासनाकडून या वाळू माफियांवर अद्याप कुठलीच कारवाई केली जात नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. हा प्रकार कोणाच्या आशीर्वादाने सुरु आहे? या प्रकरणाची सखोल चौकशी करून या वाळू माफियावरती महसूल विभागाकडून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवतक्रार म्हाळुंगी ग्रामस्थांनी केली आहे.
दरम्यान, भिमा नदीवर या भागातील शेतीला होणारा पाणी पुरवठा व पिण्याच्या पाण्याच्या योजना अवलंबून आहेत. मागील काही दिवसांपासून या नदी पात्रात वाळू माफियांच्या टोळ्यांनी उच्छाद मांडला आहे. नदीवर खुलेआम बिनदिक्कतपणे लचकेतोड सुरू असल्याने काही ठिकाणी नदीपात्राच्या नैसर्गिक प्रवाहाची दिशाच बदलली आहे. यामुळे आसपासच्या शेत जमिनीच्या क्षेत्रांना धोका निर्माण झाला आहे.
रात्री उशिरा दहानंतर ते पहाटे पाच वाजेपर्यंत जेसीबी, पोकलेनच्या सहाय्याने वाळू उपसा केला जातो. वाळू माफियांनी बेसुमार उपसा केल्याने नदी पात्रात मोठे खड्डे पडले आहेत. पर्यावरणाचे नुकसान होत असल्याने या भागातील पर्यावरण प्रेमींनी बेकायदा वाळू उपसा तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे. परंतु, शिरूर महसूल विभागाने ‘हाताची घडी अन् तोंडावर बोट’ असे धोरण ठेवल्याने वाळू माफियांनी नदीपात्रात अक्षरक्ष: हैदोस घातला आहे.
बेकायदा वाळू उपसा झाल्याची माहिती अद्याप माझ्यापर्यंत आलेली नाही. याबाबत संबंधित तलाठी यांच्याशी बोलून माहिती घेते. आणि त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.
– मनीषा खैरे ( मंडलाधिकारी – न्हावरा, ता. शिरूर)
याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.