पुणे : रक्तदाब कमी झाल्यावर घेतले जाणार्या मॅफेनटरमाईन सल्फेट या इन्जेक्शनचा नशा करण्यासाठी वापर करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या इन्जेक्शनचा साठा करुन त्यांची बेकायदेशीररीत्या विक्री करणार्यास हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
ओंकार अंगद बिनवडे ( वय-२१, रा. प्रगतीनगर, काळेपडळ रोड, हडपसर ) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडे मॅफेनटरमाईन सल्फेट या इन्जेक्शनच्या ३९ बाटल्या निदर्शनास आल्या आहेत. आरोपी ओंकार हे इन्जेक्शन ६०० ते ७०० रुपयांना विक्री करत होता. बाजारभावानुसार त्यांच्याकडे २५ हजार रुपयांचा माल आढळून आला आहे.
हडपसर पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरुन पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे, पोलीस अंमलदार दीपक कांबळे, निलेश किरवे, अभिजित राऊत यांनी कारवाई करुन ओंकार बिनवडे याला ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, आरोपी ओंकर याच्याकडे कोणतेही औषध विक्री करण्याची परवानगी नाही. तसेच त्याने औषध विक्री करण्याचे कोणतेही शिक्षण घेतले नाही. हे औषध केमिकलचे असून डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वापरल्यास व व्यक्तीस टोचल्यास त्यातील विषारी द्रव्यांचे दुष्परिणाम होऊन औषध घेणार्या व्यक्तीच्या आरोग्यास गंभीर इजा होऊ शकते. हे माहिती असुन सुद्धा नशा करण्यासाठी गैरवापर करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीररित्या विक्रीकरीता ते बाळगले असल्याचे निदर्शनास आले आहे. याप्रकरणी पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.