केडगाव : दौंडच्या पुर्व भागातील वनक्षेत्रातील वनजमिनीतून बेकायदा वृक्षतोड, कोळसा खाणी आणि बेकायदा माती उत्खनन सुरू होते. या प्रकरणी पुणे वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दौंडचे वनपाल रवींद्र मगर आणि वनरक्षक किरण कदम यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करुन त्यांना निलंबित केले आहे.
तसेच दौंड वनपरिक्षेत्र अधिकारी कल्याणी गोडसे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याची घटना नुकतीच घडली. त्यात पुनः खडकी येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून खडकी ते नंदादेवी पठाणवस्ती परिसरातील सुरू असलेल्या रस्त्याच्या कामासाठी वन विभागाच्या हद्दीत बेकायदा मुरूम उत्खनन केल्याने केडगाव येथील कोकरे ब्रदर्स या ठेकेदावर वन विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
मागील काही दिवसापासून खडकी ते नंदादेवी पठाण वस्ती त्या रस्त्यावर वन विभागाच्या हद्दीत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्त्याचे काम सुरु आहे. या रस्त्याच्या कामासाठी वन विभागाच्या हद्दीत काम करण्यासाठी वन विभागाने रितसर परवानगी दिली आहे.
मात्र काम करणाऱ्या संबंधित ठेकेदाराने वन विभागाच्या हद्दीतील गट नं. 712 व 712 मध्ये जेसीबी आणि पोकलेन मशीनच्या सहाय्याने बेकायदा मुरूम उत्खनन केले. या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून शेकडो ब्रास मुरूम उत्खनन केल्याचे चित्र आहे. या संदर्भात स्थानिक ग्रामस्थांनी तक्रारी केल्यानंतर दौंड वन विभाग खडबडून जागे झाले.
दौंडचे तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे, वनपाल नानासाहेब चव्हाण, वनरक्षक महेश जाधव, कर्मचारी तुकाराम देशमाने, बाळू अडसूळ यांनी नुकतीच उत्खनन केलेल्या ठिकाणची पाहणी करून पंचनामा केला. तर या प्रकरणात केडगाव (चौफुला -बोरीपार्धी ) येथील कोकरे कन्स्ट्रक्शन अँड ब्रदर्स या ठेकेदारावर वन विभागाच्या हद्दीत बेकायदा मुरूम उत्खनन करणे आणि वन क्षेत्रात नुकसान केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
परंतु गुन्हा दाखल करून कायद्याच्या पळवाटा शोधून राजकीय दबाव किंवा आर्थिक तडजोडी करून ठेकेदाराला बगल दिल्याची शक्यता नागरिक व्यक्त करीत आहेत. त्यामुळेच तक्रारी केल्यानंतर केवळ दिखावा म्हणून संबधित ठेकेदार वर गुन्हा दाखल केला आहे. अद्याप वन विभागाने वाहने जप्त केली नाहीत. संगनमताने बेकायदा मुरुम उत्खनन केले असल्याची चर्चा दौंड मध्ये पसरू लागली आहे. त्यामुळे दौंड तालुक्यात वन विभागावर तीव्र नाराजी पसरली आहे .