-योगेश पडवळ
कवठे यमाई : शिरुर तालुक्यातील पश्चिम भागात अनेक हॉटेल्स, विनापरवाना अनेक धाबे, हॉटेल्समध्ये खुलेआम देशी- विदेशी दारू विक्री होत आहे. यावर कुणाचे नियंत्रण नाही. नियंत्रण असणारी सर्वच खाती महिन्याला येणाऱ्या पाकिटाच्या आतील खात आहेत. एकीकडे तालुक्यात पूर्णपणे दारूबंदी व्हावी असे वाटत आहे. तर दुसरीकडे पोलिसांच्या वरद हस्तामुळे खुलेआम दारू विक्री सुरू आहे.
शिरूर तालुक्यातील पश्चिम भागातील अंतर्गत रस्ते, सविंदणे, कवठे यमाई, मलठण, सविंदने, आमदाबाद पिंपरखेड, काठापुर, चांडोह, फाकटे प्रत्येक गावांत जाणाऱ्या रस्त्यांवर अर्धा किमीच्या आत हॉटेल, धाबे आहेत. या ठिकाणी खुलेआम दारू व्यवसाय सुरू आहे. या हॉटेल्सला परवाना नसून विना परवाना हे व्यवसाय सुरू आहेत. तालुक्यात परवाना नसणारे सुमारे 80 टक्के हॉटेल, धाबे व्यवसाय करणाऱ्यांकडे नाहीत. ग्रामपंचायत, नगर परिषद यांचा परवाना नाही. खुलेआम विना परवाना चालणाऱ्या व्यवसायधारकांवर शासनाचा वचक नसल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर हे हॉटेल आहे का दारूचा गुत्ता हे कळत नाही. सर्व हॉटेलमध्ये विनापरवाना दारू व्यवसाय सुरू आहे. त्यामुळे अन्न भेसळ प्रतिबंधक विभाग, उत्पादन शुल्क विभाग, पोलीस प्रशासन, ग्रामपंचायतीचे नियंत्रण सुटले असल्यामुळे हा अवैध धंदा सुरु आहे.
परिसरात बनावट दारू मोठ्या प्रमाणात मिळत आहे. हे हॉटेल्स मालक औद्योगिक वसाहतील भाई लोकांचे आहेत. त्यामुळे पोलीस खाते आणि दारू माफियांची छुपी युती तरूण पिढी बरबाद करीत आहे. सध्या निवडणुकीचे वातावरण असल्याने तरुणाई धाब्यांवर दिसु लागली आहे.