अमिन मुलाणी
सविंदणे : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात गुटख्याची सर्रास विक्री होताना दिसत आहे. राज्य शासनाने गुटखा विक्रीवर बंदी घातली असली, तरी या बंदीच्या आदेशाची पायमल्ली झालेली पाहायला मिळत आहे. कवठे येमाई येथील गुटखा विक्रेत्यावर कारवाई होऊनसुद्धा, ग्रामीण भागातील रस्ते तसेच अष्टविनायक महामार्गाच्या कडेला असलेल्या पानाच्या टपऱ्यांमधून, किराणा मालाच्या दुकानांमधून तसेच हॉटेल व्यवसायिकांकडून मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारचा गुटखा तसेच ओला मावा विकला जात आहे. ग्रामीण पोलीस यंत्रणा आणि अन्न व औषध विभागाची मेहरबानी या व्यावसायिकांवर असल्याने बेकायदा गुटखा विक्रीला उत आला आहे. सविंदणे, कवठे येमाई, मलठण, टाकळी हाजी, जांबुत आदी गावांचा प्रामुख्याने यामध्ये समावेश आहे.
कायदा न तोडता तो पद्धतशीरपणे वाकवण्याची मनोवृत्ती असलेल्या महाभागांनी सुपारी व तंबाखू अशा दोन पुड्या तयार करून यापासून पळवाट काढण्याचा प्रयत्न केला. सरकारने तोही हाणून पाडला. अवैध प्रकारच्या उत्पादनांवर कारवाई करण्याचे आदेश सरकारने दिले. परंतु हे आदेश धुडकावून लावत, स्थानिक पोलीस यंत्रणेशी आर्थिक संबंध प्रस्थापित करून अशा उत्पादनांची विक्री सुरूच ठेवलेली दिसत आहे.
धार्मिक स्थळे, शाळा तसेच महाविद्यालय परिसराच्या १०० मीटरच्या आत तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास तसेच सेवन करण्यास बंदी असतानाही शाळा व विद्यालयाजवळच्या अनेक दुकानांतून गुटखा विक्री सुरू आहे. महाविद्यालयीन तरुण तसेच कर्त्या पुरुषांचे व्यसनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेले दिसत आहे. डोळेझाक करणारी सरकारी यंत्रणा या गोष्टीला कारणीभूत असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. चिरीमिरी घेऊन सर्रास गुटखा विक्री होत असल्याचे नागरिकांकडून दबक्या आवाजात बोलले जात आहे.