पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीवर संचालक मंडळ अस्तित्वात आल्यापासून अनेक अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट झाला आहे. अनधिकृत बांधकामांची चौकशी लागल्यानंतर काही दिवस अनधिकृत कामांना काहीसा ब्रेक लागला होता. मात्र, काही काळ लोटल्यानंतर अनधिकृत कामे जोरात सुरू झाली आहेत. या कामांमागे नेमका कुणाचा हात आहे, अशी चर्चाही आता जोरात रंगू लागली आहे.
भुसार बाजारातील ३४९ क्रमांकांच्या गाळ्यावर शनिवारी (दि. १९) अनधिकृत काम सुरू झाले होते. या कामाचा गाजावाजा झाल्यानंतर हे काम तत्काळ थांबविले. याबाबत सचिव राजाराम धोंडकर म्हणाले की, संबंधित भूखंडधारकाने अनधिकृत बांधकाम करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, बाजार समितीने ते काम तत्काळ थांबविले आहे. यापुढील काळात ३४९ क्रमांकाच्या गाळ्यावर पुन्हा अनधिकृत बांधकाम करण्याचा प्रयत्न झाल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे. याबाबतच्या सूचनाही दिल्या आहेत.
दरम्यान, संचालक मंडळ अस्तित्वात आल्यापासून १९ भूखंडधारकांनी केलेल्या अनधिकृत बांधकामाबाबतची चौकशीही सुरू झाली आहे. समितीने अनधिकृत बांधकाम पाडून टाकण्याबाबत अतिक्रमण विभागाला सूचना दिल्या आहेत. मात्र, सचिवांनी दिलेल्या आदेशालाही केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे या बांधकामांवर कारवाई होणार की नाही? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तसेच कारवाई करण्यास बाजार समितीच्या सचिवांकडूनच टाळाटाळ केली जात असल्याची चर्चाही रंगली आहे. तसेच सचिवांवर कोणाचा दबाव आहे का? अशीही अशीही दबक्या आवाजात कुजबुज सुरु आहे.