लोणी काळभोर : गेल्या काही दिवसांपासून यवत (ता. दौंड) व उरुळी कांचन (ता. हवेली) पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात मटका, जुगार, गांजा विक्री, गावठी दारु व देह विक्री व्यवसायासह सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांचे स्तोम माजले आहे. पोलीस प्रशासन या अवैध धंद्यांवर कारवाईचा बडगा उगारीत नसल्याने अवैध धंदे सुसाट चालत आहेत. तर पोलीस प्रशासनाने ”हाताची घडी अन् तोंडावर बोट” असे धोरण अवलंबले आहे. त्यामुळे यवत व उरुळी कांचन पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पुणे ग्रामीण पोलीस दलातील सर्वात मोठे पोलीस ठाणे म्हणून यवत पोलीस ठाण्याची ओळख असून त्याची हद्दही मोठी आहे. सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोरीऐंदी ते पाटस यादरम्यान असलेल्या पुणे-सोलापूर महामार्गाचा भाग येतो. या महामार्गालगत अनेक अवैध व्यवसाय सुरु आहेत. संबंधित अवैध धंदे चालकांच्या पाठीमागे काही राजकीय नेते व पोलीस खात्यातील काही वरिष्ठांचे आशीर्वाद आहेत. त्यामुळे हे धंदे राजरोसपणे सुरु असून गुन्हेगारांचे अड्डे बनले आहेत. त्यामुळे ”अवैध धंदे जोमात, तर पोलीस प्रशासन कोमात”, अशी म्हणण्याची वेळ सर्वसामान्य नागरिकांवर आलेली आहे.
उरुळी कांचन पोलीस ठाण्याची परिस्थितीही काही वेगळी नाही. या पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोरतापवाडी, नायगाव व उरुळी कांचन शहरात तीन मोठे जुगाराचे अड्डे नव्याने सुरु झाले आहेत. तर शिंदवणे व पांढरस्थळ परिसरात मोठ्या प्रमाणात हातभट्टीची दारू तयार केली जाते. या दारूची मागणी पुणे शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असते. अनेक टपऱ्यांवर अवैध गुटखा व गांजाची विक्री केली जाते. तर चौकाचौकात व काही केशकर्तनाच्या दुकानात मटका खेळला जातो.
उरुळी कांचन व यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत परवाने नसताना यातील जवळपास प्रत्येक गावामध्ये अवैध गावठी दारू, ताडी आणि गांजाची विक्री राजरोसपणे सुरू आहे. तर अनेक हॉटेल व्यावसायिक मद्यविक्री करत आहेत. वाढत्या अवैध धंद्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर अवैध धंद्यांच्या त्रासामुळे सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत. काही ठराविक मंडळी ही पोलीस आणि अवैध धंदे करणाऱ्या व्यक्ती यांच्यामध्ये मध्यस्थी करण्याचे काम करताना सर्रासपणे दिसून येत आहे.
जिल्हा ग्रामीण पोलीस दलाची तगडी यंत्रणा असतानाही अवैध धंदे बिनधास्त सुरु आहेत. या अवैध धंद्यावर पोलीस कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याची चर्चा दबक्या आवाजात नागरिकांमध्ये सुरु आहे. तसेच हे सगळे अवैध धंदे खुलेआम सुरु आहेत, मग यवत व उरुळी कांचन पोलीस नेमके करतात तरी काय? असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे. स्वच्छ प्रतिमा म्हणून ओळख असलेले जिल्हा (ग्रामीण) पोलीस अधीक्षक पंकज देशमुख हे यावर ठोस उपाययोजना म्हणून काय कारवाई करणार?. याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.