उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा एकदा गावठी दारु विक्री, मटका, जुगार, गुटखा आणि गांजा विक्री यासारख्या सर्वच प्रकारचे अवैध धंदे नव्या जोमाने सुरु झाले आहेत. उरुळी कांचनसह शिंदवणे, नायगाव व परिसरात अवैध धंदे खुलेआम चालू असूनही, पोलीस प्रशासनाने मात्र ”हाताची घडी अन् तोंडावर बोट” असे धोरण अवलंबले आहे. याबाबत नागरिकांमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. त्यामुळे उरुळी कांचन पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत मोठमोठे 5 मटक्याचे, तर दोन जुगाराचे अड्डे सुरु आहेत. नायगाव परिसरात लहान-मोठे हातभट्टी विक्रीची दुकाने आहेत. तर उरुळी कांचन परिसरातील पांढरस्थळ, सोरतापवाडी, शिंदवणे येथील कंजारवस्ती व नायगाव येथील भिल्ल वस्ती परिसरात हातभट्टीची मुबलक दारू बनवली जाते. हातभट्टीमध्ये रसायन मिसळून दारू काढली जात आहे. त्यामुळे दारूचे सेवन करणाऱ्याच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध ठेल्यांवर, हॉटेलमध्ये बेकायदा अवैध दारू विक्री राजरोसपणे सुरु आहे. दारुबंदीच्या निर्णयानंतरही शहरात काही ठिकाणी दारु विक्री, तसेच खुलेआम मटका आणि जुगार स्थानिक ठाणेदारांच्या आशिर्वादाने सुरु असल्याचे चित्र आहे. पोलीस ठाण्यातीलच काही कर्मचाऱ्यांचे या अवैध धंदेवाल्यांशी आर्थिक हितसंबंध असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरु झाली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना आपआपल्या हद्दीतील सर्वच अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते तरीही अवैध धंदे रोखण्याची स्थानिक पोलिसांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही मानसिकता दिसून येत नाही. ते कारवाईकडे कानाडोळा करीत असल्याने येथील मटका, जुगार आणि दारूची खुलेआम विक्री सुरु झाल्याने येथे गुन्हेगारांची संख्या देखील वाढली आहे. हे अवैद्य धंदे शहरातील रस्त्यालगत खुलेआम दुकाने थाटून सुरु आहेत. ही दुकाने स्थानिक व वरिष्ठ पोलीस अधिकारी ये-जा करताना पाहत असतात. मात्र, कारवाई का करत नाही? हा प्रश्न कायम नागरिकांना सतावत आहे.
दरम्यान, उरुळी कांचन पोलीस ठाणे हे पुणे शहर पोलीस दलातून जिल्हा ग्रामीण पोलीस दलात समाविष्ठ होऊन आठ महिने होत आले आहेत. परंतु, अवैध व्यवसाय हे कमी होण्यापेक्षा त्यामध्ये वाढ होत असल्याची नागरिकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा आहे. यामुळे उरुळी कांचनसह परिसरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. येणाऱ्या काळात उरुळी कांचन पोलिस जनतेचा विश्वास कसा संपादन करणार? याकडेच सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.