प्रदिप रासकर
निमगाव भोगी : राज्यात एक महिन्यापुर्वी विधानसभा निवडणुका पार पडल्या. राज्यात महायुतीची सत्ता आली. शिरुर-हवेली तसेच आंबेगाव-शिरुर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे दोन्ही उमेदवार विजयी झाले. त्यानंतर महिनाभरातच शिरुर तालुक्यातील शिक्रापुर, रांजणगाव MIDC आणि शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत बेकायदेशीर गुटखा विक्री, पान मसल्याच्या नावाखाली खर्रा विक्री, गावठी दारु, जुगार, मटका तसेच अनेक अवैध धंद्याचा सुळसुळाट झाला आहे.
लोकसभा निवडणुकीपुर्वी पुणे जिल्ह्यात अनेक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक म्हणुन पंकज देशमुख यांची नियुक्ती झाल्यानंतर पुणे जिल्ह्यातील सर्व अवैध धंद्याना मोठ्या प्रमाणावर आळा बसला. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतरही अवैध धंदे बंदच होते. मात्र, विधानसभा निवडणुक झाल्यानंतर पुणे जिल्ह्यात अवैध धंद्याना पुन्हा सुरुवात झाली आहे. तसेच शिरुर तालुक्यातील शिरुर, रांजणगाव MIDC आणि शिक्रापुर पोलिस स्टेशन हद्दीतही पुन्हा अवैध धंद्याचा सुळसुळाट झाला आहे.
शिरुर तालुक्यात पोलिसांचा धाक आहे का?
शिरुर तालुक्यात काही पोलिस, तसेच आमदार, खासदार यांचे नातेवाईक स्वतःच्या खाजगी चारचाकी गाड्यांना पोलिस, आमदार, खासदार अशा विविध नावाच्या पाट्या लावून अनेकजण बिनधास्तपणे वावरत आहेत. तसेच अनेक दुचाकी गाड्यांना फॅन्सी नंबरप्लेट, तर काही दुचाकी बुलेट गाड्यांना कर्णकर्कश आवाजाचे सायलेन्सर लावलेले असुन या गाड्या सर्रासपणे शिरुर तालुक्यातील वर्दळीच्या ठिकाणी वावरत असतात. त्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून शिरुर तालुक्यात खरंच गुन्हेगारांना पोलिसांचा धाक आहे का? असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना प्रश्न पडला आहे.
तालुक्यात काळ्या काचांच्या गाड्यांचा सुळसुळाट
शिरुर तालुक्यात अनेक चारचाकी गाड्यांना काळ्या काचा असून त्यातल्या अनेक गाड्या राजकीय पुढाऱ्यांच्या नातेवाईकांच्या आहेत. सर्वसामान्य व्यक्तीने जर वाहतुकीचा एखादा नियम मोडला, तर पोलिस तात्काळ त्याच्यावर कारवाई करतात. परंतु, राजकीय व्यक्तींच्या नातेवाईकांवर कारवाई करण्यासाठी मात्र पोलिस धजावत नाहीत. त्यामुळे राजकीय लोकांना वेगळा न्याय आणि सर्वसामान्य लोकांना वेगळा न्याय असेच काहीसे चित्र सध्या शिरुर तालुक्यात दिसत आहे.