पुणे : लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने सर्व अवैध धंदे बंद करण्यात आले होते. तसे आदेशही पोलीस प्रशासनाच्या वतीने दिले होते. त्या अनुषंगाने आजही पुणे शहरातील अवैध धंदे बंद आहेत. मात्र, विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पुणे जिल्हा व पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्व अवैध धंदे पुन्हा नव्या जोमात सुरु झाल्याचे दिसून येत आहेत.
पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार व जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पुणे शहर व जिल्हा ग्रामीण पोलीस दलाची सूत्रे जानेवारी 2024 ला हाती घेतली. सूत्रे हाती घेतल्यानंतर दोघांनीही कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे शहर व जिल्ह्यातील अवैध धंदे बंद केले होते. यामुळे गुन्हेगारीला थोड्याफार प्रमाणात आळा बसला होता. तर या निर्णयाचे सर्वसामान्य नागरिकांनी स्वागत करून आयुक्त अमितेश कुमार व जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख कौतुकही केले होते.
दरम्यान, या 10 महिन्यांच्या कालावधीत नागरिकांनी भारतीय लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव साजरा केला. लोकसभा व विधानसभा निवडणुका अत्यंत शांततेत पार पडल्या. नागरिकांनी कायद्याचे पालन करून सन, उत्सव, यात्रा व जयंती साजऱ्या केल्या. त्यामुळे कोठेही गालबोट लागले नसल्याचे दिसून आले.
पुणे शहरात अवैध धंदे बंद करण्याचे दिलेले आदेश अद्यापही कायम आहेत. तर विधानसभा निवडणुक प्रक्रिया संपल्यानंतर पुणे जिल्हा ग्रामीण व पिंपरी-चिंचवड हद्दीत अवैध धंदे खुलेआम सुरु झाले आहेत. परवाने नसताना जिल्ह्यात अनेक हॉटेल व्यावसायिक बेकायदा मद्यविक्री करत आहेत. तसेच अवैध गावठी दारू, ताडी, गांजा, मटका, गुटखा यांची विक्री राजरोसपणे सुरू आहे. याचबरोबर विविध लॉजवर देहविक्री व्यवसाय बिनधास्त सुरु आहे. या सर्व अवैध धंद्यांचा सामान्य नागरिकांना त्रास होत आहे.
नागरिकांची घोर निराशा
अवैध व्यावसायिकांची दहशत असल्याने नागरिक तक्रार करण्यास पुढे येत नाहीत. अवैध धंदेचालक, मालक आणि पोलिसांचे संगनमत असल्याने याबाबत तक्रार कुठे करायची? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. तसेच अवैध व्यवसायांवर पोलीस प्रशासनाकडून कारवाई होऊन आळा बसेल, अशी अपेक्षा करणाऱ्या नागरिकांची घोर निराशा झाली आहे. तर, वाढत्या अवैध धंद्यामुळे जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
प्रतिबंध करणारी यंत्रणाच कुचकामी
इंदापूर, दौंड, बारामती, सासवड, भोर, मुळशी, वेल्हे, हवेली, शिरूर, खेड, मावळ या तालुक्यांमध्ये सर्व प्रकारचे धंदे सुरु आहेत. गावोगावी तरुण व्यसनांच्या आहारी गेल्याचे चित्र दिसून येत आहे. वर्चस्व वादातून गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चाललेल्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यास प्रतिबंध करणारी पोलीस यंत्रणाच कुचकामी ठरत असल्याने, अशा प्रकारचे गुन्हे वाढत आहेत.