उरुळी कांचन: गेल्या काही महिन्यांपासून उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वच प्रकारचे अवैध धंदे जोरात सुरु आहेत. उरुळी कांचनसह परिसरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट सुरु असतानादेखील पोलीस प्रशासन अवैध धंद्यांवर कारवाई करताना दिसून येत नाही. त्यामुळे पोलीस प्रशासनाकडून हाताची घडी अन तोंडावर बोट ठेवून अप्रत्यक्षरीत्या अवैध धंद्यांना पाठबळ दिले जात आहे का? अशी चर्चा नागरिकांमध्ये जोरदार सुरु आहे. तर कोरेगाव मूळ (ता. हवेली) येथील मुळा-मुठा नदीच्या किनारी हातभट्टी दारूच्या अड्ड्याचा व्हिडीओ ‘पुणे प्राईम न्यूज’च्या हाती लागला आहे.
उरुळी कांचन, शिंदवणे, कोरेगाव मूळ, वळती व सोरतापवाडी परिसरात मटका, जुगार, देशी -विदेशी मद्य विक्री, गावठी दारूचे उत्पादन, खुलेआम गुटखा विक्री, तसेच विनापरवाना लॉजही फार्मात आले आहेत. पोलीस ठाण्याच्या हद्दीत परवाने नसताना यातील जवळपास प्रत्येक गावामध्ये अनेक हॉटेल व्यावसायिक मद्यविक्री करत आहेत. सामान्य नागरिकांना या अवैध धंद्यांचा त्रास होत आहे. तर वाढत्या अवैध धंद्यामुळे उरुळी कांचनसह परिसरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. हे सगळे खुलेआम सुरु असताना उरुळी कांचन पोलीस नेमके करतात तरी काय? असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरिकांमधून विचारला जात आहे.
सदर परिसरात 35 पेक्षा अधिक गाड्या गौणखनिजाची अवैधरीत्या वाहतूक करत आहेत. या प्रत्येक गाडीमागे 1500 रुपये प्रमाणे 52500 रुपये, वीटभट्टी वाहतूक करणाऱ्या 40 गाड्यांकडून 1 हजार प्रमाणे 40000 रुपये, स्टील व लोखंडाच्या गाड्यांकडून 40000 रुपये घेतले जातात. शिंदवणे व वळती येथील वाळू काढण्याच्या ठिकाणाहून प्रत्येकी 50 हजार प्रमाणे 1 लाख, मटका व जुगाराच्या तीन धंद्यांकडून प्रत्येकी 80000 प्रमाणे 2 लाख 40 हजार रुपये, शिंदवणे, उरुळी कांचन व कोरेगाव मूळ येथील तीन हातभट्टी अद्द्यांकडून 1 लाख प्रमाणे 3 लाख रुपये वसुली केली जाते.
उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टपऱ्यामधून गुटखा व गांजा विक्री करणाऱ्यांकडून 1 लाख रुपये, 10 लॉजकडून 1 लाख रुपये, 15 भंगार दुकानांकडून 75 हजार रुपये, तर वाळूच्या 30 गाड्यांकडून 5000 रुपये प्रमाणे 1 लाख 50 हजार रुपयांची माया गोळा केली जाते. अशी एकूण 12 लाखांहून अधिक रुपयांची माया महिन्याला गोळा होते. एवढी मोठी माया किती आणि कोणाच्या घशात जाते, याचे मात्र उत्तर अद्यापही गुलदस्त्यातच आहे.
दरम्यान, हातभट्टीमध्ये घातक रसायन मिसळून दारू काढली जाते. त्यामुळे पिणाऱ्याच्या जीवाला धोका होतो. इतर मद्यांच्या तुलनेत हातभट्टीची दारू ही कमी किमतीत मिळते. त्यामुळे कष्टमय व हलाकीचे जीवन जगणारा गरीब समाज या हातभट्टीच्या आहारी जातो. परिणामी अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. मात्र कोरेगाव मूळ येथे खुलेआम सुरु असलेल्या हातभट्टी तयार करण्याच्या अड्ड्याचा व्हिडीओ ‘पुणे प्राईम न्यूज’च्या हाती लागला आहे. त्यामुळे जी गोष्ट सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीस पडते, तीच गोष्ट पोलिसांना दिसत नाही का? पोलीस यंत्रणा सर्वकाही माहिती असूनदेखील धृतराष्ट्रासारखी डोळ्यावर पट्टी बांधून बसली आहे का? याच कोड सर्वसामान्य जनतेला पडलं आहे.