पुणे : ‘पुणे प्राईम न्यूज’च्या दुसऱ्या वर्धापन दिनाच्या मुर्हतावर ‘IGNITED STORIES – शून्याकडून क्षितिजाकडे’ या पुस्तकाचे उत्साहात लोकार्पण करण्यात आले. तसेच ‘इग्नाइटेड स्टोरीज’, ‘होमली टिफीन’, ‘पुणे फाईंड्स’ आणि ‘प्रावी कन्सल्टन्सी’ या नवीन तीन वेबसाईट्स देखील लाँच करण्यात आल्या.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार राजन पाटील, जेष्ठ कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक, प्रसिद्ध अभिनेते आरोह वेलणकर, आमदार अशोक पवार, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, मुख्यमंत्र्याचे ओएसडी मंगेश चिवटे, भाजपचे पुणे (उत्तर) जिल्हा अध्यक्ष शरद बुट्टे-पाटील, पुणे प्राईम न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक जनार्दन दांडगे, साधना बँकेचे संचालक सुभाष काळभोर, शाहीर जगदीश ओव्हाळ हे उपस्थित होते.
‘IGNITED STORIES – शून्याकडून क्षितिजाकडे’ या पुस्तकाचे प्रकाशन झाल्यानंतर नबाजी काळभोर, प्रताप गायकवाड, संदीप सातव, सुभाष साठे, मंगेश चिवटे, भाऊसाहेब आव्हाळे, रामदास जगताप, शंकर गायकवाड, महादेव कांचन, अरुण डोंगरे यांचा गौरव करण्यात आला. सत्काराला उत्तर देत असताना आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी मनोगत व्यक्त करताना माजी आमदार राजन पाटील म्हणाले की, ‘पुणे प्राईम न्यूज’चे काम हे कौतूकास्पद असून ते जनसामान्यांचा आवाज बनले आहेत. इग्नाइटेड स्टोरीजच्या माध्यमातून यशस्वी लोकांचा प्रेरणादायी प्रवास समोर मांडला आहे. उद्योग क्षेत्रात नव्याने पदार्पण करणाऱ्या प्रत्येकासाठी हे पुस्तक मनोबल उंचावण्यास मदत करेल. तसेच ‘पुणे प्राईम न्यूज’ने केवळ पुणे जिल्ह्यापुरते मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकावा, अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली. पाटील यांनी सर्व सत्कारमूर्तींचे अभिनंदन देखील केले.
जेष्ठ कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी सर्वप्रथम ‘इग्नाइटेड स्टोरीज’ पुस्तकाचे महत्व सांगत सर्व सत्कारमूर्तींच्या कार्यावर प्रकाश टाकला. पुढे बोलताना डॉ. मुळीक म्हणाले की, प्रत्येकाने व्यवसाय करताना शेतीला केंद्रबिंदू मानून व्यवसाय करावा. तसे झाल्यास शेती आणि शेतकरी दोन्ही टिकण्यास मदत होईल. त्यामुळे देशाची वाटचाल आणखी वेगाने होण्यास होईल. प्रगत देशाप्रमाणे आपण देखील शेतीकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे आहे. जेणेकरून शेतकरी हा द्रारिद्र्यात अडकणार नाही. त्यालाही सुखी जीवन जगता येईल, असं देखील मुळीक म्हणाले. तसेच जास्तीत जास्त शेतीपूरक व्यवसाय उभे राहावेत, अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्ती केली.
मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे म्हणाले की, ‘पुणे प्राईम न्यूज’चे जेवढे कौतुक करावे, तेवढे थोडेच आहे. कारण नेहमी वेगळी वाट पकडून समाजासाठी काय करता येईल, हा त्यांचा अट्टाहास असतो. यावेळी चिवटे यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या कामाबद्दल देखील माहिती दिली. ते म्हणाले की, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाद्वारे आतापर्यंत ३२१ कोटींचा निधी देण्यात आला असून जवळपास चाळीस हजार लोकांचा जीव वाचवण्यात यश आले आहे.
तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीसाठी कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही. ज्याला निधीची गरज आहे, तो थेट ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. त्यासाठी कोणाकडेही हेलपाटे मारण्याची गरज नाही. तसेच सरकारकडून ज्याने हात आणि पाय गमावले आहेत, त्यांना लवकरच कृत्रिम अवयव देण्यात येणार आहे. गरजूंनी मदतीसाठी संपर्क करण्याचे आवाहन देखील मंगेश चिवटे यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात बोलताना पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद यांनी ‘पुणे प्राईम न्यूज’च्या कार्यावर प्रकाश टाकत वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच आपल्या क्षेत्रात यशस्वी झालेल्या सर्व सत्कारमूर्तींचे अभिनंदन केले. पुढे बोलताना कंद म्हणाले की, माध्यमांची ताकद ही मोठी आहे. बातमीचे वार्तांकन करताना ते जबाबदारीने केले पाहिजे. ‘पुणे प्राईम न्यूज’ ते चोखपणे पार पाडत आहे.
तसेच नवीन तरुणांनी वेगवेगळ्या कल्पना घेऊन उद्योग क्षेत्रात पाऊल ठेवायला हवे. या क्षेत्रात तरुणांसाठी मोठी संधी आहे. यासाठी ‘इग्नाइटेड स्टोरीज’ हे त्यांच्यासाठी मैलाचा दगड ठरेल, असं देखील प्रदीप कंद यांनी म्हटले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक ‘प्रावी कन्सल्टन्सी’चे प्रमुख मल्हार पांडे यांनी केले. तसेच ‘इग्नाइटेड स्टोरीज’ पुस्तक निर्मितीच्या पाठीमागील संकल्पना ‘इग्नाइटेड स्टोरीज’चे संपादक मकरंद माळवे यांनी सर्वांसमोर मांडली. सूत्रसंचालन महेश खूळपे यांनी तर जेष्ठ पत्रकार सुनील जगताप यांनी आभार मानले.