पुणे : अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. नुकतीच कोंढवा खुर्द परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीला आली आहे. एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन, ‘तू मला खूप आवडतेस, तू माझ्यासोबत बोलली नाहीस तर मी आत्महत्या करेन,’ अशी धमकी देऊन तिचा विनयभंग केला. तसेच मुलीचा मानसिक छळ केल्याप्रकरणी एका तरुणावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा प्रकार मे २०२३ ते गुरुवार (ता. १४) या दरम्यान कोंढवा खुर्द, शिवनेरीनगर येथे घडला. याबाबत अल्पवयीन (वय १७) मुलीच्या आईने (वय-३५) कोंढवा पोलीस ठाण्यात गुरुवारी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी रमजान अब्बाज पटेल (वय-१९, रा. शिवनेरीनगर, गल्ली नं. २३, कोंढवा खुर्द) याच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची मुलगी वेस्टर्न कॉम्प्लेक्स (लष्कर) येथे कामाला आहे. आरोपी रमजान पटेल हा देखील तेथेच काम करत असल्याने दोघांची एकमेकांशी ओळख झाली. आरोपीने फिर्यादीच्या मुलीचा अनेकदा पाठलाग केला. ‘तू मला खूप आवडतेस, माझ्यासोबत बोलली नाहीस तर मी आत्महत्या करेन’ अशी धमकी देऊन तिचा विनयभंग केला. या प्रकारामुळे मुलगी भयभीत झाली.
दरम्यान, मुलीने या प्रकाराबाबत घरात सांगितले असता, मुलीच्या आईने कोंढवा पोलिसांत धाव घेत आरोपी विरोधात फिर्य़ाद दिली. या घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक थोरात करीत आहेत.