पुणे : पुण्यात नवनियुक्त आयुक्तांनी दोन दिवस सुमारे ५०० गुन्हेगारांना एकत्र करून त्यांची परेड काढली. सज्जड दमही दिला. गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणारे व्हिडिओ करायचे नाहीत, रिल्स बनवायचे नाहीत, स्टेटस ठेवायचे नाही, अशा सूचना दिल्या. सगळ्यांना दम देऊनही पोलिसांचे आदेश न मानता सोशल मीडियावर रिल्स पोस्ट करणे सुरुच असेल आणि परेड काढूनही कोणाची मस्ती जिरत नसेल तर पोलीसी खाक्या दाखवावाच लागेल, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी गुन्हेगारांना सज्जड दम भरला.
कोणताही गुन्हा करायचा नाही, कोणत्याही गुन्ह्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठींबा द्यायचा नाही, सहभागी व्हायचे नाही, गुन्हेगारीच उदात्तीकरण करणारे व्हिडिओ करायचे नाहीत, रिल्स बनवायचे नाहीत, स्टेटस ठेवायच नाही अशा सूचना देऊनही पोस्ट करणे सुरुच आहे. या गुन्हेगारांना पोलीसी खाक्या दाखवायलाच हवा. आयुक्तांची भेट घेऊन यासंदर्भात नेमकी कारवाई कोणती करायची किंवा गुन्हेगारी रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना करायच्या या संदर्भात चर्चा करणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
गुन्हेगारांवर वचक बसविण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हेगारी टोळ्या आणि सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार कुख्यात गुंड गजानन मारणे, नीलेश घायवळ, बाबा बोडके, बंडू आंदेकर, टिपू पठाण, कंचीले अशा प्रमुख १५ गुन्हेगारी टोळ्यांसह नव्या उभरत्या ५० टोळ्यांतील सुमारे सराईत गुन्हेगारांना परेडसाठी पोलीस आयुक्तालयात हजेरीसाठी बोलावण्यात आले. गुन्हेगारी थांबली नाही तर पुणे पोलीस कठोर उपाययोजना करण्याच्या तयारीत आहे.