पुणे : ‘विरोधक म्हणतात मी सात वेळा आमदार झालो, आठव्यांदा कशाला? आता मला सांगा, घरातील वडीलधारी मंडळी किती ही मोठी झाली तर आपण त्यांना बाजूला करतो का? आपण त्यांचा सांभाळ करतो ना? मात्र सत्तेच्या हव्यासापोटी ते असे आरोप करत आहेत.. असे म्हणत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी टिकाकारांना जोरदार उत्तर दिले आहे. आंबेगाव विधानसभेतून उमेदवारी अर्ज भरत असताना ते बोलत होते.
आंबेगावमधून भरला उमेदवारी अर्ज…
आजपासून विधानसभा निवडणुकांसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते, मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आंबेगाव मतदार संघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मंत्री दिलीप वळसे पाटलांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रांताध्यक्ष सुनिल तटकरे हे सुद्धा उपस्थित होते. अर्ज भरण्याआधी वळसे पाटील यांचे त्यांच्या निवासस्थानी औक्षण केले त्यासोबत परिसरातील प्रमुख देवतांचे दर्शन देखील घेत ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रवाना झाले. अर्ज भरल्यानंतर झालेल्या मेळाव्यात बोलताना त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लबोल केला.
नेमकं काय म्हणाले वळसे पाटील?
विरोधक म्हणतात मी सात वेळा आमदार झालो, आठव्यांदा कशाला? आता मला सांगा घरातील वडीलधारी मंडळी कितीही मोठी झाली तर आपण त्यांना बाजूला करतो का? आपण त्यांचा सांभाळ करतोच. मात्र सत्तेच्या हव्यासापोटी ते असे आरोप करत आहेत, असा टोला त्यांनी यावेळी विरोधकांना लगावला. तसेच यंदाच्या विधानसभेत परिस्थिती बदललेली आहे. मात्र माझ्या समोर कोणतंही आव्हान नाही, असा विश्वास दिलीप वळसे पाटलांनी यावेळी व्यक्त केला.