पुणे : लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha elections) धामधूम सगळीकडेच पाहावयास मिळत आहे. निवडणुकीसाठी जो तो आपल्या कामात व्यस्त आहेत. त्यात मतदान करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर 12 पुरावे ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले आहेत. त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर संबंधिताना मतदान करता येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे (Collector Dr Suhas Diwases) यांनी दिली.
पुणे जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीअंतर्गत उद्या सात मे (मंगळवारी) बारामती लोकसभा मतदारसंघांत (Baramati Lok Sabha Constituency) मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी ही माहिती दिली. छायाचित्र असलेले मतदार ओळखपत्र आहे असे मतदार केंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्र सादर करतील. छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करु शकणार नाहीत. अशा मतदारांची ओळख पटविण्यासाठी निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या 12 पैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे या 12 पैकी एखादा जरी पुरावा सोबत असेल तर तुम्ही मतदान करु शकाल.
ही आहेत 12 ओळखपत्रे
– वाहन चालक परवाना
– बॅंक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक
– पासपोर्ट
– पॅनकार्ड
– केंद्र अथवा राज्य सरकार तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचा-यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र
– राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जणगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड
– निवृत्तीवेतनाची दस्तावेज,
– संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र
– मनरेगाअंतर्गत देण्यात आलेले रोजगार ओळखपत्र
– कामगार मंत्रालयाद्वारा वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड
– आधार कार्ड
– केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाच्या वतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र