बापू मुळीक / सासवड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जेजुरी येथील पुतळा पुरंदर तालुका प्रशासन आणि नॅशनल हायवे प्राधिकरण यांनी रस्ता रुंदीकरणाच्या नावावर कुणालाही विश्वासात न घेता असंविधानीक पध्दतीने काढून टाकला आहे. या घटनेला सात महिने झाले आहेत.
त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा प्रशासनाने शासकीय खर्चातून उभा करावा, आता आंबेडकरी अनुयायांची सहनशीलता संपली असून १४ एप्रिल पर्यंत पुतळ्याचे काम न झाल्यास राज्यातील आंबेडकरी चळवळीतील जनता रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते व आंदोलनाचे आयोजक विष्णूदादा भोसले यांनी प्रशासनास दिला आहे.
१४ जून २०२४ रोजी पुरंदर तालूका प्रशासन आणि नॅशनल हायवे प्राधिकरण यांनी रस्ता रुंदीकरणाच्या नावावर पुरंदर तालुक्यातील राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, आंबेडकरी अनुयायी, पत्रकार यांना कोणालाही विश्वासात न घेता घटनाकार बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा एखादा दगड उचलून टाकावा अशा प्रकारे काढून टाकला आहे.
त्या महामानवाच्या पुतळ्याचे काम शासनाच्या खर्चाने तात्काळ सुरु करण्यात यावे, या मागणीसाठी विविध सामाजिक संघटनेच्या वतीने, आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते विष्णूदादा भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली गुरुवार (दि. ९) जानेवारी रोजी जेजुरी नगरपरिषदेच्या आवारात जाहीर निदर्शने आंदोलन करण्यात आले.
यावेळी आंदोलन कर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी करुन महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे काम तात्काळ सुरु करण्यात यावे, अशी मागणी जेजुरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले यांच्याकडे निवेदन देऊन केली. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासंदर्भात जेजुरी नगरपरिषद स्तरावरील सर्व कामकाज पूर्ण झाले असून, नगररचना विभागाकडून एक मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष काम सुरू होईल.
चारुदत्त इंगोले, मुख्याधिकारी, जेजुरी नगरपरिषद