लोणी काळभोर : संपूर्ण महाराष्ट्रात ११ गुंठ्याच्या नोंदी सातबारा उताऱ्यावर केल्या जात आहे. मात्र, त्याला पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्याची ‘ॲलर्जी’ आहे. हवेली तालुक्याच्या काही गावामध्ये सामुदायिक खरेदीखताच्या नोंदी होत नसल्याने भाजप व शिवसेना आक्रमक झाली असून, या नोंदी न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २० डिसेंबरला आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे.
भाजपा महाराष्ट्र आघाडी प्रदेशचे संयोजक पै. संदीप भोंडवे, भाजपचे हवेली तालुकाध्यक्ष शामराव गावडे व शिवसेनेचे (शिंदे गट) तालुकाप्रमुख विपुल शितोळे यांनी याबाबतचे निवेदन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, हवेलीचे प्रांत संजय आसवले, हवेली तहसिलदार किरण सुरवसे यांना दिले आहे.
हवेली तालुक्यातील काही गावामध्ये तलाठी व मंडल अधिकारी ११ किंवा त्यापेक्षा जास्त गुंठे सामाईक खरेदीखताच्या नोंदी सातबारा उताऱ्यावर करत आहेत. तर पेरणे-वाडे बोल्हाई या जिल्हा परिषद गटातील ११ किंवा त्यापेक्षा जास्त गुंठे सामाईक खरेदीखताची नोंद होत नाही. हवेलीतील काही तलाठी व सर्कल अकरा गुंठे नोंदीसाठी लाख मोलाचा प्रोटोकॉलप्रमाणे कारभार करत आहे. यासाठी विशेष करून काही मंडल अधिकारी व तलाठ्यांनी आपली वसुलीची वेगळी यंत्रणा व कार्यपध्दत अवलंबली आहे. ‘प्रोटोकॉल’मुळे कार्यक्षेत्रातील काही गावामध्ये अकरा गुंठ्याची नोंद होते तर काही गावामध्ये ‘प्रोटोकॉल’ मिळत नसल्याने नोंद होत नसल्याचे ‘पुणे प्राईम न्यूज’च्या सर्व्हेक्षणात स्पष्ट झाले आहे.
…अन्यथा २० डिसेंबरला आमरण उपोषण
महाराष्ट्रात ११ किंवा त्यापेक्षा जास्त गुंठे सामाईक खरेदीखताच्या नोंदीसाठीचा कायदा महाराष्ट्रात सर्वाना सारखा असताना व त्या कायद्यानुसार खरेदीखताच्या नोंदी होत असताना मात्र हवेली तालुक्यामध्ये काही गावामध्ये सामाईक खरेदीखताच्या नोंदी न करणे म्हणजे तेथील शेतकरी बांधवावर अन्याय करण्यासारखे आहे. जर ११ किंवा त्यापेक्षा जास्त गुंठे सामाईक खरेदीखताच्या नोंदी कायद्याने करण्याची तरतूद नसेल तर पुणे जिल्ह्यामध्ये मागील १० वर्षात ज्या गावामध्ये अशा प्रकारच्या नोंदी ज्या तलाठी व मंडल अधिकारी यांनी केलेल्या आहेत. त्यांची चौकशी करून संबंधित नोंदी रद्द कराव्यात. अन्यथा २० डिसेंबरला भारतीय जनता पार्टी व शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे.
हवेली प्रांत अधिकाऱ्यांना पत्र
हवेली प्रांत अधिकारी संजय आसवले यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे. त्यानंतर त्यांनी ७ नोव्हेंबरला तहसीलदार व मंडल अधिकारी यांना पत्र काढून शासनाचा जीआर पाठवला आहे. जिरायत २० गुंठे व बागायत १० गुंठे यांची खरेदीदस्ताची नोंद सातबारा उताऱ्यावर करण्याचे आदेश दिले आहे, अशी माहिती पै. संदीप भोंडवे यांनी दिली आहे.
परिपत्रकानुसार शासकीय निर्देश पाहून नोंदी करणार
कोर्टकामी बाहेरगावी असल्याने निवेदन काय आले आहे, तसेच वरिष्ठ कार्यालयातून आलेल्या सूचनेबाबत माहिती नाही. त्याबाबत माहिती घेण्यात येईल. मात्र, शासनाच्या तुकडेजोड व तुकडेबंदी परिपत्रकानुसार शासकीय निर्देश पाहून नोंदी केल्या जातील.
– किरण सुरवसे, तहसीलदार हवेली