राहुलकुमार अवचट
यवत : बारामती लोकसभेच्या विद्यमान खासदार व आगामी लोकसभेच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. आज दौंड तालुक्यातील गावांचा दौरा करत असून, सकाळी दौंड ते यवत असा डेमो लोकलने प्रवास करून त्यांनी रेल्वे प्रवाशांच्या विविध समस्या जाणून घेतल्या.
संपूर्ण देशात बारामती लोकसभा मतदारसंघ चर्चेत आहे. शरद पवार व अजित पवार या पवार कुटुंबियांमध्येच याठिकाणी लढत होणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. सुप्रिया सुळे आता प्रचारासाठी पूर्ण ताकदीने उतरल्या आहेत. लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी बारामती लोकसभा मतदारसंघात प्रचारास सुरुवात झाली आहे. नणंद आणि भावजय लढतीची चर्चा सध्या सुरु असून, रोज दोन्ही उमेदवारांचे दौरे सुरु आहेत. लोकांशी गाठीभेटी, संवाद, बैठका सुरु आहेत. यवत स्टेशन, गणेश मंगल कार्यालय परिसरातील सुळे यांनी नागरिकांशी संवाद साधला. तसेच यवत गावातील व्यापारी वर्गाच्या दुकानात जाऊन प्रत्यक्ष भेटी दिल्या व प्रचार पत्रकाचे वाटप केले. यानंतर श्री काळभैरवनाथ मंदिर येथे नागरिकांशी संवाद साधला.
दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी गेल्या वर्षभरामध्ये ‘माझा मतदार संघ माझा अभिमान ’ या अभियानांतर्गत दौंड तालुक्यातील बहुतांश गावांना भेटी दिल्या आहेत. आज सुप्रिया सुळे यांचा दौरा यवतपासून सुरु झाला. या वेळी यवत ग्रामस्थांच्या वतीने सतीश दोरगे यांनी सुप्रिया सुळे यांचे स्वागत केले. बारामतीमध्ये नुकताच ‘नमो महारोजगार’ मेळावा पार पडला. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका केली. सुरवातीला ४३ हजार नोकऱ्या आहेत असे सांगत असताना प्रत्यक्षात १० हजार नोकऱ्या दिल्या. मग ३० हजार नोकऱ्या गेल्या कुठे, दिलेल्या नोकऱ्या ७ मे पर्यंत नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, लोकसभा निवडणूक आली की मोठ-मोठे मेळावे घेतात आणि खर्च केंद्र सरकार करते. या सगळ्यामधून जाहिरात कुणाची होते? यामध्ये सरकारी यंत्रणेचा गैरवापर हा सातत्याने यांची जाहिरात करण्यासाठी होत आहे, हे मोठे दुर्दैव आहे असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. नमो रोजगार मेळाव्यासाठीच्या पेंडॉलचा एक दिवसाचा खर्च हा १ कोटी आहे. सरकारने शासन आपल्या दारी किंवा अशा प्रकारच्या मेळाव्यावर खर्च करण्यापेक्षा या खर्चातून शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली असती तर आशीर्वाद मिळाले असते, असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी सडकून टीका केली.
राजकीय विरोधकांबरोबर आमचे मनभेद नाहीत तर मतभेद आहेत. दुर्दैव आहे की सध्या देशात दूषित राजकारण झालंय. महाराष्ट्रातील ४८ खासदारांपैकी ३८ खासदार भाजपचे असूनही लोकसभेत बोलत नाहीत. नुकतेच इथेनॉलबाबत झालेल्या चर्चेत लोकसभेत प्रश्न उपस्थित केल्याबद्दल भाजपाच्या नेत्यानेच आभार व्यक्त केले. शेतकऱ्यांसाठी लढणे हे जर पाप असेल तर फाशी द्या, असे सुप्रिया सुळे यांनी या वेळी सांगितले. कष्टकरी, शेतकरी, सामान्य नागरिक व गोरगरीब जनतेसाठी लोकशाहीच्या माध्यमातून त्यांचा आवाज म्हणून बारामती लोकसभेच्या रिंगणात उमेदवार म्हणून उभी असल्याचे सांगत उपस्थित मतदारांना मतदानाचे आवाहन केले.
या वेळी अमित दोरगे, विलास नागवडे, शिवसेनेचे दत्तात्रय कुल, काँग्रेस पक्षाचे अरविंद दोरगे, शिवसेनेचे दौंड शहराध्यक्ष आनंद पळसे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटाचे) दौंड तालुका अध्यक्ष अप्पासाहेब पवार यांनी आपले मनोगत व्यक्त करत सुप्रिया सुळे यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे रामभाऊ टुले, योगिनी दिवेकर, सोहेल खान, अजित शितोळे, मयूर दोरगे, सचिन काळभोर, काँग्रेस पक्षाचे विठ्ठल दोरगे, उमेश म्हेत्रे आदी मान्यवर व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.