सासवड : जेजुरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा अधिकाराचा गैरवापर करुन काढून टाकणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई न केल्यास राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर आंदोलन करु, असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष सतिश केदारी यांनी दिला आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे काम नवीन जागेत तात्काळ सुरु करण्यात यावे, तसेच जेजुरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा काढून टाकणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. पुरंदरच्या प्रांत वर्षा लांडगे, तहसिलदार विक्रम राजपूत, भोर उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, जेजुरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले, जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक वाघचौरे व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अभियंता या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेडकडून करण्यात येत आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे काम नवीन जागेत तात्काळ सुरु करण्यात यावे या मागणीसाठी सासवड येथील शिवतीर्थावर रिपाइंच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. यावेळी बोलताना सतीश केदारी म्हणाले की, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा काढून टाका असे आदेश नसताना देखील , बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल असलेल्या द्वेषातून अधिकाराचा गैर वापर करुन, संबंधित अधिकाऱ्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा काढून टाकला आहे. त्यामुळे या सर्व अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी सतीश केदारी यांनी यावेळी केली.