पुणे : आमची भाषणे धारदार झाली तर आम्हाला आयसीईच्या नोटीस येतात, असा टोला राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपला लगावला आहे. देशात दडपशाहीचे राजकारण सुरू आहे. विरोधात बोलल्याने जवळपास ९५ टक्के ईडी, सीबीआय आणि आयकर खात्याच्या नोटीस या विरोधी पक्षातील लोकांना आल्या असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
रोहित पवारांना ईडीची नोटीस आल्याच्या मुद्द्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आमच्या कुटुंबाला ईडी,सीबीआय आणि आयकर खात्याच्या नोटीस येतात त्या नवीन वाटत नाहीत. भ्रष्टाचारमुक्त आणि काँग्रेसमुक्त भारत करण्यासाठी भाजपने काँग्रेसचे किती नेते भाजपात गेलेत याचा आढावा घ्या. त्यामुळे काँग्रेस संपवायला निघालेल्या भाजपाने त्यांचे किती नेते त्यांच्या पक्षात अथवा सहकारी पक्षात घेतलेत हे सर्वांनी पाहिले, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
जागा वाटपावर सुप्रिया सुळेंचे भाष्य
पुढच्या २-४ दिवसांत महाविकास आघाडीचे जागावाटप निश्चित होईल. प्रत्येक राज्यातील जागावाटपाचे धोरण वेगळे असेल. पण महाराष्ट्रात आम्ही एक टीम म्हणून चाललो आहोत.
सर्वांना आंदोलनाचा अधिकार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला आंदोलनाचा अधिकार दिला आहे. जरांगे पाटलांनी मुंबईला येण्याचा इशारा आधीच दिला होता. मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लीम समाजाच्या आरक्षणाचा विषय सोडवला असता तर आज सरकारवर हा दिवस आला नसता. राज्याचे सरकार आणि गृह मंत्र्यांनी आंदोलनातून मार्ग काढण्याची तयारी केली असेल बघूया पुढे काय होते असं सुप्रिया सुळेंनी सांगितले. दरम्यान, आरक्षणाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अतिशय संवेदनशील आहे. जर सरकारने कुठला कायदा आणला तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ असे सुप्रिया सुळेंनी म्हटले.