पुणे : मुंबईतील मालाड पश्चिम येथील एका डॉक्टरला आईस्क्रीम खाताना त्यामध्ये माणसाचं कापलेले बोट आढळलं होतं. आता या प्रकरणाचं पुणे कनेक्शन समोर आलं आहे. हे आईस्क्रिम युम्मो ब्रँडचे असून पुण्यातील हडपसर येथील फॉर्च्युन प्लांटमध्ये हे आईस्क्रीम तयार केले जात असल्याचे तपासात समोर आले आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर डॉक्टर तरुणाने थेट मलाड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी यम्मो आईस्क्रिम कंपनीच्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मुंबईतील युम्मो कंपनीच्या आईस्क्रीममध्ये 13 जून रोजी मानवी बोट सापडले होते. आईस्क्रीमच्या रॅपवर लक्ष्मी आईस्क्रीम प्रा. लि., गाझियाबाद, यूपी असा मॅन्युफॅक्चरिंग पत्ता लिहिलेला होता. ही कंपनी गाझियाबादच्या ट्रॉनिका सिटी औद्योगिक परिसरात आहे.
एका दैनिकाने याबाबत कंपनीचे संचालक यादेश्वर पाल यांच्याकडे चौकशी केली, त्यावेळी त्यांनी सांगितले की, आम्ही युम्मो सह अनेक कंपन्यांसाठी आईस्क्रिम तयार करतो आणि देशभरात पुरवतो. मात्र आमच्या कंपनीचा मुंबईतील घटनेशी काहीही संबंध नाही.
पुढे बोलताना म्हणाले, आईस्क्रीम कंपनीचे रॅपर सामान्य झाले आहे. या रॅपर्सवर सर्व उत्पादन प्रकल्पांची नावे एकत्रित लिहिली आहेत. मॅन्युफॅक्चरिंग प्लांटला बॅच कोड असतो. यावरुन हे आईस्क्रीम कोणत्या कंपनीत तयार केले आहे हे ओळखता येते. मुंबईत ज्या आईस्क्रिममध्ये मानवी बोट आढळून आले आहे.
त्याचा बॅच कोड त्याच्या रॅपरवर लिहिलेला आहे. कोडचे आईस्क्रीम पुण्यातील हडपसर येथील फॉर्च्युन प्लांटमध्ये तयार केले जाते. तर गाझियाबादच्या लक्ष्मी आईस्क्रीम कंपनीचा बॅच कोड डी ने सुरु होतो. फॉर्च्युन आणि लक्ष्मी या दोन्ही थर्ड पार्टी कंपन्या असल्याचे त्यांनी सांगितले.
युम्मो कंपनीकडून याप्रकरणी प्रतिक्रिया देण्यात आली आहे. आम्ही हे उत्पादन थर्ड पार्टीकडून घेतलं आहे. त्यांचे उत्पादन थांबवण्यात आले आहे. शिवाय मार्केटमध्ये गेलेले उत्पादन देखील परत बोलावण्यात आले आहे. याप्रकरणी आम्ही तपास करत असून संबंधित प्रशासनाला पूर्ण सहकार्य केले जाईल, असं कंपनीकडून सांगण्यात आले आहे.