पुणे : राज्यात नाही तर देशात ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकर यांची जोरदार चर्चा सुरु आहे. पूजा खेडकर यांचे एकेक कारनामे समोर येत आहे. पूजा खेडकरने तिच्या ऑडी कारमध्ये लाल दिवा लावला आणि त्यावर ‘महाराष्ट्र सरकार’ असे लिहिलेल्याचा आरोप आहे. आता या प्रकरणात पूजा खेडकरने वापरलेली ऑडी कार वाहतूक विभागाने चतु: श्रृंगी पोलीस ठाण्यात आणली आहे. पुढील तपासणी आणि कागदपत्र पडताळणीसाठी कार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
#WATCH | Pune, Maharashtra: The Audi car used by trainee IAS officer Pooja Khedkar has been brought to the Chaturshringi police station of the traffic division. It has been brought here for further investigation and document verification. pic.twitter.com/2IXbCBRmTi
— ANI (@ANI) July 14, 2024
पुणे आरटीओने ही कार ज्या कंपनीच्या नावावर आहे त्यांच्यावर कारवाई करण्याची तयारी केली होती. आरटीओच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘पुणे आरटीओने गुरुवारी सायंकाळी एका खासगी कंपनीला नोटीस बजावली. कार क्रमांक MH-12/AR-7000 ही कंपनीच्या नावावर नोंदणीकृत होती. नोंदणी केलेल्या वापरकर्त्याचा पत्ता हवेली तालुक्यातील शिवणे गाव असा देण्यात आला आहे, त्यामुळे लवकरात लवकर तपास करता यावा. यासाठी कंपनीला नोटीसमध्ये कार पोलीस स्टेशनमध्ये आणण्याचे निर्देश देण्यात आले होते.
पुणे आरटीओने आपल्या फ्लाइंग स्क्वॉडला कारचा शोध घेण्यासाठी आवश्यक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर आज पोलिसांना ही कार सापडली आहे. पूजा खेडकर यांची नुकतीच पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून वाशिममध्ये बदली करण्यात आली आहे. दरम्यान खासगी वाहनांवर लाल दिवा लावणे, सरकारी चिन्हांचा वापर करणे, आयएएस अधिकाऱ्यासारख्या सुविधा मागणे, वेगळी कॅबिन, स्वतंत्र सरकारी बंगला अशा काही मागण्या त्यांनी केल्याने त्या चर्चेत आहेत.