पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोडचिट्टी दिल्यानंतर वसंत मोरे विविध पक्षांच्या प्रमुखांच्या भेटी घेत आहेत. तसेच त्यांनी पुण्यात झालेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीला देखील उपस्तिथ होते. त्यानंतर त्यांनी आज वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि सुजात आंबेडकर यांची भेट घेतली आहे.
या भेटीनंतर त्यांनी पुन्हा एकदा लोकसभा लढणार आणि जिंकणारच असा निर्धार व्यक्त केला आहे. त्यामुळे पुणे लोकसभा मतदार संघातून वंचित बहुजन आघाडी वसंत मोरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार का? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिले आहे.
यावेळी बोलताना वसंत मोरे म्हणाले कि, आजची बैठक सकारात्मक झाली असून याबाबत दोन ते तीन दिवसांमध्ये निर्णय होणार आहे. तसेच आज पहिल्यांदाच चर्चेला आलेलो आहे. पुण्याची निवडणूक चौथ्या टप्प्यात असून लांब आहे. पुढच्या एक-दोन दिवसांमध्ये आणखी चर्चा होईल. उमेदवारीबाबत प्रकाश आंबेडकर दोन-तीन दिवसांमध्ये भूमिका जाहीर करतील. असंही वसंत मोरे म्हणाले.