पुणे: हैद्राबादहून मित्रांसह पुण्यात फिरायला आलेला 24 वर्षांचा गौतम गायकवाड तब्बल पाच दिवसांपासून बेपत्ता होता. मात्र अखेर तो सिंहगड किल्ल्यावरून जिवंत अवस्थेत आढळून आला. सिंहगडावर फिरत असताना एका कुत्र्याला वाचवण्यासाठी प्रयत्न करताना त्याचा पाय घसरून तो दरीत कोसळला होता. या अपघातानंतर तो काही काळ बेशुद्ध अवस्थेत होता.

या पाच दिवसात गौतम कुठे होता? त्याची काय अवस्था झाली होती? हा संपूर्ण घटनाक्रम त्याने स्वतः सांगितलं आहे. गौतम गायकवाड मित्रांसोबत सिंहगडावर आला असताना लघवीसाठी बाजूला गेला. त्याचवेळी एका ठिकाणी कुत्रा अडकलेला दिसला. त्या कुत्र्याला मदत करण्यासाठी तो पुढे गेला असता अचानक त्याचा तोल गेला आणि तो दरीत पडला. खाली पडल्यावर तो वर येण्यासाठी झगडत राहिला, मात्र खडकाळ कडा असल्याने त्याला वर येता आलं नाही. त्याने अनेकदा मदतीसाठी आरडाओरड केली, पण पाऊस व अंधारामुळे त्याचा आवाज कुणालाच ऐकू आला नाही.

अपघातानंतर तो जवळपास पाच दिवस दरीत अडकून होता. या काळात त्याला काहीही खायला-प्यायला मिळालं नाही. उपाशीपोटी आणि तहानेने व्याकुळ अवस्थेतही त्याने हिम्मत सोडली नाही. एकीकडे सतत पडणारा पाऊस, अंधार आणि भीती यामुळे तो अस्वस्थ झाला होता, तरीही तो हळूहळू शुद्धीवर आला आणि मार्ग शोधत पुढे सरकत राहिला.
शेवटी पाचव्या दिवशी त्याला काही लोक दिसले, मात्र त्याचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचू शकला नाही. तो पुढे सरकत राहिला आणि अखेर काही लोक त्याच्या समोर आले. त्यांनीच त्याला वाचवले. सध्या गौतम गायकवाडवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जाते. पाच दिवसांचा हा थरारक संघर्ष सध्या सर्वत्र चर्चेत आहे.







