पुणे : बारामती विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. यंदा प्रथमच बारामती मतदारसंघात पवार विरुद्ध पवार असा सामना होत असून काका विरुद्ध पुतण्या एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरले आहे. त्यामुळेच पवार कुटुंबीय देखील बारामतीमधील शेवटच्या प्रचारसभेत सहभागी झाल्याचं दिसत आहे.
युगेंद्र पवार यांच्यासाठी शरद पवार यांची जाहीर सभा बारामती मतदारसंघात होत आहे, तर अजित पवार यांचीही सभा येथे होत आहे. यावेळी अजित पवार म्हणाले कि, विधानसभा निवडणुकीसाठी मी 8 व्या वेळेला उभा आहे, ज्यांनी सभेचे नियोजन केलं त्यांचा अंदाज चुकला आहे. 1999 ला निवडणुकीमध्ये काय होतंय, काय नाही? असे वाटत होतं. मात्र, 50 हजार मतांनी मला बारामतीकरांनी निवडून दिलं, असं अजित पवारांनी बारामतीमधील सभेत बोलून दाखवलं.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, माझ्यावर फक्त बारामतीची जबाबदारी नाही, माझ्यावर एका पक्षाची जबाबदारी आहे, महायुतीमधील एका घटक पक्षाचा प्रमुख म्हणून माझ्यावर जबाबदारी आहे. मी बारामतीमतदारसंघातील अनेक गावात सकाळी जायचो, माझ्या भगिनीही तेव्हा सकाळ सकाळ मला भेटायच्या, त्यांच्या अडचणी सांगायच्या, अशी जुनी आठवण अजित पवारांनी बारामतीकरांना करून दिली.
साहेबांनी मला संधी दिली : अजित पवारांचे भावनिक शब्द
साहेबांनी 1990/91 ला मला संधी दिली. साहेबांनी मला प्रतिनिधित्व दिल्यानंतर आपण कमी केले तर बारामतीकर बिनपाण्याने करतील, साहेबांनी एवढं काम केलं मला जमेल का याची धाकधूक होती. तेव्हापासून लवकर उठायची सवय लागली, तेव्हापासून फक्त विकास विकास हेच केलंय. एका झटक्यात काम होतात, तहान लागायच्या आधी पाणी देतात म्हणून किंमत राहत नाही, असा मिश्कील टोलाही अजित पवार यांनी यावेळी लगावला.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, मी मागे एकटा पडलो होतो, यावेळी माझी आई माझ्यासोबत आहे. माझ्या बहिणी माझ्यासाठी फिरत आहेत. माझ्या पोटच्या पोरांनी तर माझ्यासाठी फिरलंच पाहिजे. माझी बायकोही फिरतेय, तिने तर माझ्यासोबत असलंच पाहिजे. कारण, लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही त्यांना राज्यसभा दिलीय, असंही अजित पवार यावेळी म्हणाले.