पुणे : राज्यात आमच्या सत्ताकाळात महिलांना ३० टक्के आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला. त्यानंतर हा निर्णय देशभर लागू झाला. आज ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत महिलांचा सहभाग चांगला वाढला आहे. आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा आहे, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे. ते आज शिरूर तालुक्यातील वडगाव रासाई येथे महाविकास आघाडीचे शिरूर मतदारसंघाचे उमेदवार अशोक पवार यांच्या प्रचारसभेत बोलत होते.
यावेळी शरद पवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील शैलीत नक्कल केली. काही लोक बाहेरून येऊन सांगतात, ‘घोडगंगा साखर कारखाना सुरू कसा होतो ते मी पाहतो. तसेच लोकसभा निवडणुकीच्या वेळी एका नेत्याने अमोल कोल्हे निवडून येतो की नाही ते पाहतो, असं म्हटले होते. मात्र, लोकांनी आपली जबाबदारी ओळखत कोल्हे यांना लाखोंच्या मताधिक्याने निवडून दिले, असे सांगत शरद पवारांनी अजित पवार यांना अप्रत्यक्ष टोला लगावला.
पुढे बोलताना म्हणाले, घोडगंगा साखर कारखान्याला मंजूर असलेल्या कर्जाचे पैसे दिले जात नाहीत. बँकांनी कर्ज मंजूर करण्याची तयारी दाखवली असूनही, राज्य सरकारने अडथळे निर्माण केले आहेत. सहा इतर कारखान्यांना कर्ज मंजूर करण्यात आले, मात्र, घोडगंगाला रोखण्यात आले. यामागे कोणाचा दबाव आहे हे लोकांनी समजून घेतले पाहिजे. मुख्यमंत्र्यांकडे जाऊन कर्ज मिळवण्यासाठी प्रयत्न केला, तरीही परिस्थिती बदलली नाही, असंही शरद पवार यांनी यावेळी नमूद केले.