पुणेः विधानसभा निवडणुकीत महायुतीला एकतर्फी विजय मिळाला असून महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. माविआच्या नेत्यांकडून ईव्हीएम बाबत शंका उपस्थित केली जात आहे. तर दुसरीकडे ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी ईव्हीएम विरोधातील आत्मक्लेष आंदोलनाला सुरवात केली आहे. बाबा आढाव यांच्या आत्मक्लेष आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाठिंबा दिला आहे. पुण्यातील महात्मा फुले वाड्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाला भेट देत पवार यांनी समाजातील सर्वसामान्य लोकांनीही जागृती व उठाव करण्याची गरज व्यक्त केली आहे.
माझ्या हातात पुरावा नाही, पण..
शरद पवार यांनी आंदोलनाच्या संदर्भात प्रतिक्रिया देताना सांगितले की, “माझ्या हातात पुरावा नाही, पण अनेकांच्या मनात शंका आहे की ईव्हीएमद्वारे निवडणुकीत गैरप्रकार होत आहेत. काही जणांनी याबाबत शंका व्यक्त केली आहे, ज्यामुळे निवडणूक आयोगाची भूमिकाही तपासली जावी लागेल.”
पवार यांनी सांगितले की, ‘आम्ही फेरमतमोजणीची मागणी केली आहे, मात्र त्या प्रक्रियेवरही शंका घेतली जात आहे. शेवटच्या दोन तासांतील आकडेवारी धक्कादायक असल्याचे आढळून आले आहे. सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५८.२२ टक्के मतदान झाले होते. मात्र रात्री साडेअकरा वाजेपर्यंत ते ६५.२ टक्क्यांवर कसे पोहोचले? हा गंभीर प्रश्न आहे.’ असेही शरद पवार म्हणाले.
सत्तेचा गैरवापर…
‘देशभरात निवडणुका सत्तेचा आणि पैशाचा वापर करून जिंकण्याचा प्रयत्न होत आहे. हे लोकशाहीसाठी घातक आहे. विरोधकांना संसदेत बोलण्याची संधीही दिली जात नाही. यामुळे लोकशाही धोक्यात आली आहे,’ असे म्हणत शरद पवार यांनी लोकशाहीच्या टिकावाबाबतही चिंता व्यक्त केली.
बाबा आढाव यांचे आंदोलन हे जनतेला जागृत करण्याचे एक महत्त्वाचे पाऊल आहे, असे सांगताना पवार म्हणाले की, ‘बाबांनी हा लढा सुरू केला आहे, पण त्यांना जनतेच्या पाठिंब्याची गरज आहे. आज त्याची आवश्यकता आहे. बाबांच्या उपोषणातून हे स्पष्ट जाणवते. लोकांनी उठाव केला, तर आज ना उद्या याचे परिणाम दिसतील, याची मला खात्री आहे.’ असे शरद पवार यांनी मत व्यक्त केले.
शरद पवार यांनी एक स्पष्ट केले की, ‘इंडिया आघाडीकडून ईव्हीएमवर लक्ष केंद्रित करण्याची खरी गरज आहे. ईव्हीएम हॅक होऊ शकते आम्हाला सादरीकरण दिले होते. पण आम्ही विश्वास ठेवला नाही, ती आमची कमतरता राहिली. १५ टक्के मतांबाबत पूर्वी विश्वास नव्हता, पण आता त्यावरही संशय वाढत आहे. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेसाठी सखोल चर्चा आणि उपाययोजना करण्याची गरज आहे.’