लोणावळा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. गावोगावी सभा, मेळावे, उद्घाटनांना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा मावळ तालुका कार्यकर्ता संवाद मेळावा सध्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत लोणावळ्यात सुरू आहे. या मेळाव्यासाठी कार्यकर्त्यांनी येऊ नये यासाठी अजित पवार गटाचे मावळचे आमदार सुनील शेळके यांच्याकडून दमदाटी केल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी सुनील शेळके यांना थेट इशारा दिला. शेळके, तुमच्या अर्जावर माझी सही आहे, हे लक्षात ठेवा. मलाही शरद पवार म्हणतात… अशा शब्दांत शेळके यांना सुनावले.
या वेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, मला समजले की तुम्ही पदाधिकारी, कार्यकर्ते मेळाव्याला येताय म्हणून त्यांना धमक्या दिल्या जात आहेत. मी त्यांना सांगेन की सुनील शेळके, तुम्ही आमदार कुणामुळे झाला? तुझ्या सभेला कोण आलेलं? पक्षाचा अध्यक्ष कोण होतं? तुझ्या अर्जावर माझी सही आहे. हे लक्षात ठेवा. यापुढे असं काही केलंत तर मला शरद पवार म्हणतात, हे विसरू नका. मी त्या वाटेने जात नाही, गेलो तर कोणाला सोडत नाही, अशा शब्दांत शरद पवार यांनी मेळाव्यातून थेट आमदार सुनील शेळके यांना सुनावले.
शरद पवार यांनी या वेळी अमित शहा यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. पवार म्हणाले की, देशाचे गृहमंत्री राज्यात आले होते. मुंबईत ते म्हणाले, ५० वर्षे शरद पवार बसलेत. मी त्यांचा आभारी आहे. जनतेने ५० वर्षे माझ्यावर विश्वास ठेवला हे अमित शहांनी मान्य केले. गेल्या १० वर्षांपासून मोदी सत्तेत आहेत. उत्पन्न वाढलं का? याऊलट शेतकरी आत्महत्या वाढल्या. त्यांच्यावर अशी वेळ आणली हीच मोदींची गॅरंटी का, असा सवाल पवार यांनी विचारला.