पुणे : राज्यातील राज्यपाल नियुक्त आमदारांची निवड करण्यात आली असून शपथविधीही पार पडला आहे. त्यामध्ये, महायुतीमधील भाजप पक्षाला तीन, शिवसेनेला 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील 2 जणांना संधी देण्यात आली आहे. मात्र, या निवडीनंतर पक्षांतर्गत नाराजीनाट्य सुरू झाल्याचं दिसत आहे. राष्ट्रवादीतून पंकज भुजबळ आणि इद्रीस नायकवाडी यांना आमदारकीची संधी मिळाली आहे.
तर दुसरीकडे रुपाली चाकणकर यांनाही पुन्हा एकदा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी संधी दिली आहे. त्यामुळे पुण्यातील राष्ट्रवादीचे काही नेते नाराज झाल्याचे चित्र दिसत आहे. अशातच आता राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनीही रुपाली चाकणकर यांच्या निवडीवर जोरदार टीका केली आहे.
काय म्हणाल्या रुपाली ठोंबरे?
रुपाली ठोंबरे म्हणाल्या, मला राज्यपाल नियुक्त आमदार केलं नाही हे मी समजू शकते, संघटना मजबूत झाली पाहिजे. त्यासाठी एक पक्ष एक पद हे गणित पाहिजे, असं मी अजित दादांना देखील सांगितलं आहे. काही ठिकाणी समजूतदारपणा घ्यावा लागतो, प्रत्येकजण आपल्या राजकीय फायद्यासाठी निर्णय घेत असतो. आम्ही तक्रार दादांना सांगू शकतो, मला सांगितलं तुम्ही तुमचं काम करा. एक व्यक्ती एक पद यासंदर्भात देखील निर्णय येत्या काळात घेऊ असं दादांनी म्हटलं असल्याचे ठोंबरे यांनी सांगितले.
पुढे बोलताना म्हणाल्या, पक्षात मी नाराज नव्हते, मला राष्ट्रवादी काँग्रेसने स्वीकारलं आहे. पण रुपाली चाकणकर मला बाहेरची म्हणत असेल तर बाहेरुन लढते ना, त्यांचं हे बोलणं चुकीचं आहे, अशा शब्दात ठोंबरे यांनी चाकणकर यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली. चाकणकर यांचं मी पहिले अभिनंदन केलं आहे, मी संघटनेच्याबाबत बोलत होते, एक पद-एक व्यक्ती न्याय द्यावा, त्यात रुपाली ठोंबरे पाटीलच नव्हे तर इतर महिलांना देखील पदं दिली पाहिजे.
मी लोकांमधून निवडून येणारी व्यक्ती : रुपाली ठोंबरे
मी लोकांमधून निवडून येणारी व्यक्ती, त्यांनी स्वत:वर ओढवून घेऊ नये. त्यांना माझी अडचण काय आहे? की आम्ही सर्व महिला एकत्र येत आहे ही अडचण आहे, असं म्हणत रुपाली ठोंबरे यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर टीका केली आहे. मी कसबा विधानसभा मतदारसंघातून तिकीट मागितले होतं, मात्र 2019 साली तिकीट कापलंच होतं ना, मला त्या पक्षात नवीन आलेल्या म्हणाल्यात, मी मागच्या 19 वर्षांपासून राजकारणात काम करत आहे. आमच्यात वाद नव्हता, त्यांनी गैरसमज करुन घेतलेला आहे, असंही रुपाली ठोंबरे यांनी म्हटलं आहे.