शिक्रापूर : शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथे पत्नीला भेटण्यासाठी सासरी जाणाऱ्या एका व्यक्तीला तिघा मेहुण्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. एवढंच नाही तर या घटनेत दाजीचा दात देखील पाडला आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राधे डीपीशन काळे, गुट्टन डीपीशन काळे, बहाद्दूर डीपीशन काळे अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. अरेश दादू भोसले असे मारहाण केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत अरेश दादू भोसले (वय-३०, रा. सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी राधे डीपीशन काळे, गुट्टन डीपीशन काळे, बहाद्दूर डीपीशन काळे (तिघे, रा. विश्रांतवाडी ता. हवेली जि. पुणे) या सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं प्रकरण काय ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सणसवाडी येथील अरेश भोसले याची पत्नी विश्रांतवाडी येथे माहेरी गेली आहे. त्यामुळे अरेश त्याच्या पत्नीला भेटण्यासाठी सासरी गेला होता. त्यानंतर अरेश घरी असताना त्याचे तीन मेहुणे अरेशकडे आले. त्यांनी अरेशला आमच्या घरी कशाला येतो? असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी केली. तसेच त्याला लाकडी दांडके, लोखंडी गजाने बेदम मारहाण केली.
या घटनेत अरेश गंभीर जखमी झाला. तसेच त्याचा दात देखील पाडला आणि तो बेशुद्धही झाला. या घटनेनंतर मारहाण करणारे त्याचे तीन मेहुणे पळून गेले. या प्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.