पुणे : लग्नानंतर पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करत थेट लंडन गाठत पत्नीकडे दुर्लक्ष करणाऱ्या पतीला न्यायालयाने दणका दिला आहे. पत्नीला अंतरिम पोटगी म्हणून दरमहा वीस हजार रुपये अर्ज दाखल केल्याच्या तारखेपासून अंतिम निकालापर्यंत देण्यात यावेत, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. तसेच, घरभाड्यापोटी दरमहा दहा हजार रुपये देण्याचेही न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.
विशाल आणि वैशाली (दोघांचीही नावे बदललेली) यांची ओळख विवाह स्थळ जुळविणाऱ्या संकेतस्थळावर झाली. त्यानंतर १५ नोव्हेंबर २०२२ रोजी ते लग्नबंधनात अडकले. मात्र, लग्नाच्या काही दिवसानंतर शारीरिक तसेच मानसिक त्रास देण्यास सुरवात केली. त्यानंतर, विशाल हा थेट लंडन येथे त्याचा व्यवसाय सांभाळण्यासाठी गेला. विशाल लंडन येथून आपल्याला बोलावेल असे वैशालीला वाटत होते. तो लंडन येथे स्थायिक-आयएलआर असल्यामुळे त्याकडे वैशालीला सोबत घेऊन जाण्याचा विकल्प होता. मात्र, त्याने तिचा साधारण व्हिजा काढला.
त्यामुळे तो नाकारण्यात आला. यादरम्यान, तिने विशालकडे पत्नी असल्याचे दाखवित व्हिजा काढून सोबत राहण्याकरिता न्यावे अशी विनंती केली. मात्र, विशालने त्याकडे वारंवार टाळाटाळ केली. तो लंडन येथेच राहात असल्याने वैशालीला नाईलाजास्तव आईकडे परतावे लागले. याखेरीज, त्याने तिला व तिच्या आई-वडिलांना नेहमी अपमानास्पद व पानउतारा करणारी वागणूक दिल्यानंतर तिने कौटुंबिक हिंसाचारानुसार अर्ज दाखल करत पतीमार्फत पोटगी व घरभाडे मिळावे यासाठी अॅड. प्रसाद निकम, अॅड. मन्सुर तांबोळी, अॅड. शुभम बोबडे व अॅड. प्राजक्ता बाबर यांचेमार्फत न्यायालयात अर्ज केला.
दरम्यान, पत्नीने शपथेवर सर्व गोष्टी सांगितल्याने प्रथमदर्शनी कौटुंबिक हिंसाचार झाला आहे, ही बाब ग्राह्य धरता येते. उत्पन्न लपविण्यासाठी पतीने न्यायालयात त्याचे मालमत्ता व दायित्व याचे शपथपत्र सादर केले नाही, असे गृहीत धरले. तरी, पत्नीने दाखविलेल्या कागदपत्रांनुसार पतीने २०२२ रोजी बीएमडब्ल्यू चारचाकी घेतली. याखेरीज, २०२३ रोजी त्याचे उत्पन्न २ हजार ६०९ पौंड, वायटीडी १८ हजार ५३१ पौड होते. त्यामुळे, पत्नीला घरभाडे व पोटगी देण्याची पतीची कुवत असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे.