पुणे : पुण्यातील बाणेर परिसरात एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. पतीने आपल्या पत्नीवर भर रस्त्यात चाकूने हल्ला करुन तिच्या पाठीवर आणि पोटात वार करत तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना २२ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता घडली.

या प्रकरणी बाणेर पोलिसांनी भरत मानसिंग भुल (वय ३३, रा. शिंदे मळा, कपिल मल्हासमोर, बाणेर, मुळ रा. दानकोट, जि. डोटी, नेपाळ) याला अटक केली आहे.

पोलिसांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, ‘सध्या महिलेवर वायसीएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून, महिलेने पतीविरोधात तक्रार दिली आहे. फिर्यादी या घरकाम करत असून, पती हा एका हॉटेलमध्ये काम करतो. त्याला दारु पिण्याचे व्यसन असून तो सतत त्यांच्या चारित्र्यावर संशय घेत होता. या संशयातून त्याने हा हल्ला केल्याचे पत्नीने तक्रारीत सांगितले आहे.
शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान, कामं करून पायी घरी येत असताना नवरा मागून आला आणि त्याने घरातील चाकूने पाठीवर तीन चार वार केले. पाठीमागे वळून अडविण्याचा प्रयत्न केला असता त्याने पोटावर वार केले. आणि शिवीगाळ करत घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर महिलेला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. महिलेवर सध्या उपचार सुरु असून, बाणेर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
बाणेर पोलिसांनी महिलेच्या नवऱ्यावर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला असून, पोलिसांनी चाकू जप्त केला आहे. तसेच घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.







